Friday, April 26, 2024
Homeनगरप्रेयसीची हत्या; प्रियकरास आजन्म कारावास

प्रेयसीची हत्या; प्रियकरास आजन्म कारावास

अहमदनगर|Ahmedagar

प्रियकराने कोयत्याने वार करून प्रेयसीची हत्या केल्याप्रकरणी प्रियकर प्रदीप माणिक कणसे (वय- 24 रा. तळणी ता. रेणापूर जि. लातूर) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी दोषी धरून आजन्म कारावास व 500 रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. आरोपी कणसे याने 27 मे 2016 रोजी मोहिनी तानाजी सुर्यवंशी (रा. हडगा ता. निलंगा जि. लातूर) हिच्यावर कोयत्याने वार करून तिची हत्या केली होती. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

- Advertisement -

मोहिनी ही सुट्टीसाठी नगर शहरातील बुरूडगाव रोडवर राहत असलेल्या तिचे मावस काका तिर्थप्रसाद अनंतवाड यांच्याकडे आली होती. मोहिनी गावाकडे असताना प्रदीप कणसे हा तिला लग्न करण्यासाठी त्रास देत होता. 26 मे 2016 रोजी प्रदीप त्याच्या मित्रासोबत नगर शहरात मुक्कामी आला व तो एका लॉजवर राहिला. दुसर्‍या दिवशी 27 मे रोजी प्रदीपने गंज बाजारातून एक कोयता विकत घेतला. त्याला धार लावून तो बुरूडगाव रोडवर मोहिनी राहत असलेल्या घरी गेला. तेथे त्याने मोहिनीकडे लग्नसाठी मागणी केली. यावेळी मोहिनीने त्याला नकार दिला. त्याने जवळ असलेल्या कोयत्याने मोहिनीवर वार करून तिचा जीव घेतला. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात प्रदीप कणसे विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सुरूवातीला या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद चव्हाण यांनी केला. यानंतर पोलीस उपअधीक्षक बजरंग बनसोडे यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांच्यासमोर सुरू होता. सदर खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने 19 साक्षीदार तपासण्यात आले. न्यायाधीश आणेकर यांनी आरोपीला भादवि 302 अन्वये आजन्म करावास व 500 रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड. सतिष पाटील यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी बांदल व काशिद यांनी सहकार्य केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या