नवनागापूर, वडगाव गुप्ता, निंबळक, इसळक गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करावी

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहराच्या उत्तरेला लागून असलेल्या नवनागापूर, वडगाव गुप्ता, निंबळक, इसळक या गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्यावतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन संघटनांच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना पाठविण्यात आले असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

राज्याच्या मंत्रिमंडळात तरुण असलेले नगरविकास राज्यमंत्री तनपुरे अतिशय कार्यक्षमतेने कार्य करीत आहेत. याचा जनतेला जास्तीत जास्त फायदा होत आहे. मागील आठवड्यात त्यांनी नागरदेवळे आणि आजूबाजूच्या गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याच्या वक्तव्याने सर्वसामान्य नागरिकांच्या आशा पल्लवीत केल्या आहेत. याच धर्तीवर नवनागापूर, वडगाव गुप्ता, निंबळक, इसळक या गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन केल्यास शहरासह शहरालगत असलेल्या परिसराचा झपाट्याने विकास होणार आहे.

त्यांनी दाखवलेला दूरदृष्टीकोन व विकासात्मक व्हिजनचे संघटनेच्यावतीने स्वागत करण्यात आले आहे. शहरालगत असलेला परिसर अनेक वर्षे नागरी विकासापासून वंचित राहिलेला आहे. या परिसराला न्याय देण्यासाठी तनपुरे यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. शहराच्या उत्तरेला पाच ते सहा किलोमीटर महानगरपालिका हद्दीला लागून नवनागापूर, वडगाव गुप्ता, गावे आहेत. एमआयडीसी जवळ असल्याने या भागाचा विकास झाला आहे. परंतु अतिशय नियोजनबद्ध नागरी विकासासाठी या चार गावांना स्वतंत्र नगरपालिकेची गरज आहे.

नवनागापूर हा भाग अतिशय दाट लोकवस्ती असलेला भाग आहे. या भागाला वीज, पाणी, रस्ते अशा प्राथमिक सोयी आहेत. परंतु प्लॅनिंग नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे पुढील काळात या भागात मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या तयार होतील. त्यामुळे या चार गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय घेण्याचे निवेदनात म्हटले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *