Friday, April 26, 2024
Homeनगरपालिका निवडणुका ‘आप’ स्वबळावर लढणार

पालिका निवडणुका ‘आप’ स्वबळावर लढणार

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

दिल्ली व पंजाबनंतर आम आदमी पक्षाने महाराष्ट्रात लक्ष घातले असून पक्षाच्यावतीने राज्यातील नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढविण्यात येणार असल्याची माहिती पक्षाच्या प्रवक्त्या व मुंबईच्या अध्यक्षा प्रीती मेमन शर्मा यांनी दिली.

- Advertisement -

नगरपालिकेच्या सभागृहात झालेल्या आम आदमी पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्यापुढे म्हणाल्या, श्रीरामपूर येथे पक्षाची चांगली स्थिती आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या घराण्यांकडे सत्ता आहे. ही घराणे आलटून पालटून सत्तेसाठी पक्ष बदलतात. याठिकाणी उद्योग नाही. सुतगिरणीसह अनेक संस्था बंद पडल्या आहेत. तरुण मुले शिक्षणासाठी तसेच रोजगारासाठी बाहेर जातात. त्यांना येथेच शिक्षण व रोजगार मिळला पाहिजे, यासाठी आम आदमी पक्ष प्रयत्न करेल. पक्षाने मागील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये 200हून अधिक उमेदवार दिले होते. त्यात काही ठिकाणी आम्हाला यश मिळाले आहे. दिल्ली व पंजाबच्या निवडणुकीनंतर पक्षाचे 156 आमदार व 8 खासदार झाले आहेत. हा पक्ष देशात तिसर्‍या क्रमांकाचा मोठा पक्ष झाला असून अनेक लोक वेगाने पक्षात येत आहेत.

आगामी निवडणुकीत शिक्षण व आरोग्य, रस्ते, पाणी हा पक्षाचा अजेंडा असणार आहे. दिल्लीप्रमाणे राज्यातही मोफत वीज देण्याचा प्रयत्न आहे. मोहल्ला क्लिनिक ही संकल्पना राबविण्याचा पक्षाचा विचार आहे. पालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांनंतर ज्या ठिकाणी पक्षाची ताकद आहे तेथे विधानसभा व लोकसभा निवडणुका लढविण्यात येणार आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पक्षाने पाठिंबा दिला होता. त्यामुळे राज्यातील शेतकर्‍यांच्या आंदोलनाला आम आदमी पक्षाचा पाठिंबा राहिल, असे त्यांनी स्पष्ट केले.

भारतीय जनता पक्ष हा गुंडांचा पक्ष असून सध्या धर्माच्या नावावर राजकारण सुरु आहे. त्याआडून भेदाभेद, जातीपातीचे, द्वेषाचे विष पसरविले जात आहे. आरएसएस व भाजपाचे हे काम आहे. लाऊडस्पिकर व हनुमान चालिसावरुन राजकारण केले जात आहे. यामागेही भाजपा आहे. राज ठाकरे यांना भाजपाने सुपारी दिल्याचा आरोप श्रीमती शर्मा यांनी यावेळी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या