Sunday, April 28, 2024
Homeनगररस्त्यांची दुरवस्था अन् रखडलेल्या कामांनी गाजणार सभा

रस्त्यांची दुरवस्था अन् रखडलेल्या कामांनी गाजणार सभा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

तब्बल चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला मुहूर्त मिळाला आहे. येत्या सोमवारी (दि.8) एकाच दिवशी महापालिकेत दोन सभांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 1 वाजता हर घर तिरंगा उपक्रमासंदर्भात विशेष सभा होणार आहे. तर दुपारी 2 वाजता विविध विषयांवर महापालिकेची सर्वसाधारण सभा महापौर रोहिणी शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, मार्च महिन्यात अंदाजपत्रकीय सभा झाल्यानंतर तब्बल चार महिन्यांनी महापालिकेची सभा होणार आहे. शहरातील पाण्याची समस्या, तसेच शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था व रखडलेली कामे यावरून ही सभा गाजण्याची चिन्हे आहेत.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत नगर शहरात 75 हजार 960 इमारतींवर तिरंगा ध्वज फडकविण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे. सुमारे 51 हजार ध्वज केंद्र शासनाकडून उपलब्ध होणार आहेत. तर 25 हजार ध्वजांची खरेदी महापालिका प्रशासन करणार आहे. महापालिकेकडून शहरात विविध ठिकाणी ध्वज विक्री केंद्र उभारले जाणार आहेत. यासंदर्भात पहिली सभा पार पडणार आहे.

दुपारी दोन वाजता होणार्‍या सभेत मनपाच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल झालेल्या महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी वारसांना आर्थिक मदत देणे, थकीत मानधनाची देयके देणे, ठेकेदारांची अनामत रक्कम परत करणे, यासह तारकपूर ते एसटी वर्कशॉपपर्यंत नव्याने झालेल्या रस्त्याला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देणे, अग्नी सुरक्षा अभियान अंतर्गत प्राप्त अनुदानातील शिल्लक रकमेतून साहित्य खरेदी करणे, 15 व्या वित्त आयोगातून कामे प्रस्तावित करणे, बुरुडगाव कचरा डेपो परिसरातील ग्रामस्थांना सुविधा व तेथील समस्यांबाबत चर्चा, केंद्र सरकारच्या अमृत 2 अभियानांतर्गत नव्याने प्रकल्प अहवाल तयार करून मंजुरीसाठी सादर करणे आदी विषयांवर चर्चा होणार आहे. तसेच, अमृत अभियानांतर्गत सध्या सुरू असलेल्या इलेक्ट्रिक कामकाजाच्या खर्चात होणार्‍या वाढीव खर्चास मान्यता देण्याबाबतही निर्णय होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या