Tuesday, May 14, 2024
Homeनगर‘त्या’ दोन घोटाळ्यांचा तपास संथगतीने

‘त्या’ दोन घोटाळ्यांचा तपास संथगतीने

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात मनपा कचरा संकलन घोटाळा व एमआयडीसी पोलीस ठाण्यात मर्चंट बँकेशी संबंधित फसवणूक प्रकरणी दाखल गुन्ह्यात कारवाई होत नसल्याने शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांच्याकडे तक्रार केली आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास संथगतीने सुरू असून, तपासासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

- Advertisement -

महापालिकेतील कचरा संकलन व वाहतूक करणार्‍या स्वयंभू ट्रान्सपोर्ट या ठेकेदार संस्थेने महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी जाधव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल आहे. मात्र, तोफखाना पोलिसांकडून संथ गतीने तपास सुरू आहे. बनावट कागदपत्रे करून ठेकेदार संस्थेने फसवणूक केल्याप्रकरणी कोर्टाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, तपासी अधिकारी जाणीवपूर्वक आरोपीस अटक न करता कागदोपत्री तपास सुरू असल्याचे भासवत असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.

मर्चंट बँक फसवणूक प्रकरणी दाखल गुन्ह्यात दोन वर्षे कुठलाही तपास झालेला नाही. मी पत्र देऊन लक्ष वेधल्यानंतर घाईघाईने जबाब नोंदवून घेण्यास सुरुवात झाली आहे. संगनमताने खोटे कर्ज प्रकरण करून बँकेच्या 10.25 कोटींच्या रकमेचा अपहार करण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकरणात लक्ष घालून स्वतंत्र तपास पथक नियुक्त करावे, असे जाधव यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या