Thursday, April 25, 2024
Homeनगरमनपाच्या अतिक्रमण पथकावर दगडफेक; कर्मचारी जखमी

मनपाच्या अतिक्रमण पथकावर दगडफेक; कर्मचारी जखमी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर जोरदार दगडफेक करण्यात आली. यात महापालिका कर्मचारी दत्तात्रय केशव जाधव (वय 54) जखमी झाले आहेत. झेंडीगेट येथील बाबा बंगाली परिसरात मंगळवारी दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी 10 ते 15 जणांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभाग अधिकारी मेहेर गंगाधर लहारे यांनी फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

सादिक बाबुलाल शेख, सोफीयान सादिक शेख, अजहर सादिक शेख, अलीज सादिक शेख, आसीफ नुरमोहंमद कुरेशी, शहेबाज जब्बार कुरेशी, निसार तांबोळी, अमजद जब्बार कुरेशी, निसार कुरेशी (सर्व रा. झेंडीगेट व बाबाबंगाली परिसर) यांच्यासह इतर पाच ते सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबा बंगाली परिसरात हिंदुस्थान गॅरेज येथे अनधिकृतपणे पत्र्याचे गाळे बांधून अतिक्रमण करण्यात आले होते. सदरचे गाळे कारवाई करून पाडण्याबाबत आदेश देण्यात आले होते.

प्रभाग समिती कार्यालयाकडून प्रभाग अधिकारी मेहेर लहारे यांनी मंगळवारी दुपारी कारवाई सुरू केली. कारवाई सुरू असतानाच शेजारील गाळा पाडण्याची मागणी काहींनी केली. यावरून संबंधित दोन गटांमध्ये बाचाबाची होऊन दगडफेक सुरू झाली. त्यानंतर काहींनी कारवाईसाठी उपस्थित असलेल्या महापालिकेच्या कर्मचार्‍यांवर जोरदार दगडफेक केली. यात दत्तात्रय जाधव या कर्मचार्‍याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. जवळच असलेल्या खासगी रूग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच महापालिका कामगार युनियनचे अध्यक्ष कॉ. अनंत लोखंडे व इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर उपायुक्त यशवंत डांगे, शहर अभियंता सुरेश इथापे, अतिक्रमण निर्मूलन विभागाचे रोहिदास सातपुते यांनीही कोतवाली पोलिसात जाऊन पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्याशी चर्चा केली.

दिवसाढवळ्या महापालिका कर्मचार्‍यांवर प्राणघातक हल्ले होण्याचे प्रमाण वाढत असल्याने कर्मचार्‍यांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात कामगार युनियनच्यावतीने बुधवारी मनपात आयुक्तांशी चर्चा करून पोलीस बंदोबस्ताशिवाय यापुढे कर्मचारी कारवाई करणार नाही, अशी मागणी करणार असल्याचे अध्यक्ष लोखंडे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या