Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याMulayam Singh Yadav: शिक्षक, तीनदा यूपीचे मुख्यमंत्री ते केंद्रीय संरक्षणमंत्री, जाणून घ्या...

Mulayam Singh Yadav: शिक्षक, तीनदा यूपीचे मुख्यमंत्री ते केंद्रीय संरक्षणमंत्री, जाणून घ्या नेताजींची कारकीर्द

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांचे निधन झाले. तब्येत खालावल्यामुळे मुलायमसिंह यादव हरियाणातील गुरुग्रामच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये आयसीयूत उपचार घेत होते.

मुलायम सिंह यादव सध्या लोकसभेचे खासदार होते. राजकारणात येण्यापूर्वी ते शिक्षक म्हणून ज्ञानदानाचं काम करत होते. मुलायम सिंह यादव यांनी करहल येथील जैन इंटर कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलं आणि पुढे तिथेच शिक्षक म्हणून रुजू झाले. शिक्षक म्हणून ज्ञानदानाचं काम करताना ते सायकल वरुन प्रवास करायचे.

- Advertisement -

मुलायम यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९३९ साली उत्तर प्रदेशमधील इटावा येथे झाला. त्यांनी अगदी तरुण वयापासून राजकारणात सक्रीय सहभाग घेतला होता. १९९२ साली मुलायम सिंह यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली.

५ डिसेंबर १९८९ रोजी मुलायम यांनी पहिल्यांदा राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. ते २४ जानेवारी १९९१ पर्यंत या पदावर कार्यकरत होते. नंतर मायावती राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या.

१९९२ साली समाजवादी पक्षाची स्थापना केल्यानंतर वर्षभरात म्हणजेच ५ डिसेंबर १९९३ रोजी मुलायम सिंह दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. पुढील ११ वर्षांमध्ये सातत्याने संघर्ष करत त्यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारली.

२९ ऑगस्ट २००३ रोजी यांनी तिसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्याआधीच म्हणजेच चार वर्ष झाल्यानंतर ११ मे २००७ रोजी पदाचा राजीनामा दिला.

उत्तर प्रदेशच्या राजकारणावर आपली छाप पाडणाऱ्या मुलायम सिंह यादव यांनी केंद्रामध्येही संरक्षण मंत्रीपदासारखी महत्त्वाची भूमिका पार पाडली. एच.डी. देवेगौडा आणि त्यानंतर इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान असताना मुलायम सिंह यादव हे संरक्षण मंत्री होते.

१ जून १९९६ ते १९ मार्च १९९८ दरम्यान त्यांनी या पदाची जबाबदारी पार पाडली. त्यानंतर हे पद जॉर्ज फर्नान्डिस यांनी संभाळलं. उत्तर प्रदेशच्या राजकारणात मुलायम सिंह यादव यांच्या नावाला वेगळं वलय आहे. आज त्यांच्या जाण्याने अवघं उत्तर प्रदेश हळहळलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या