Friday, April 26, 2024
Homeनगरविरोध असेल तर शासन वाळूचा लिलाव करणार नाही

विरोध असेल तर शासन वाळूचा लिलाव करणार नाही

करजगाव |वार्ताहर| Karajgav

ग्रामस्थांचा वाळू लिलावास विरोध असेल तर शासन वाळूचा लिलाव करणार नाही, असे आश्वासन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुरध्वनीवरून दिल्यानंतर मुळाकाठ परिसरातील ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले.

- Advertisement -

शासनाने जाहीर केलेल्या नेवासा तालुक्यातील अंमळनेर येथील मुळानदी पात्रातून वाळू लिलाव व निंभारी येथिल वाळू डेपोच्या विरोधात मुळाकाठ परिसरातील गावांनी गाव बंद ठेवून गुरूवार दि 11 मे पासून करजगाव-नेवासा रस्त्यावरील लक्ष्मीआई चौकात आंदोलन सुरू केले होते.

शनिवारी दिवसभर उपोषणास्थळी नगर उपविभागीय प्रांताधिकारी सुधीर पाटील, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, तहसीलदार डॉ. संजय बिरादार, नेवाशाचे पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे, राहुरीचे पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे, सोनईचे सहायक पोलीस निरीक्षक माणिकराव चौधरी, उपनिरीक्षक राजेद्र थोरात, आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच दंगल नियंत्रण पथकासह पोलीस कर्मचारी ठाण मांडून होते.वाळूचा एक खडाही उचलु देणार नाही तसेच महसूल विभागाकडुन लेखी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार या ग्रामस्थांच्या भुमिकेमुळे महसुल विभागापुढे पेच निर्माण झाला होता.

महसुल विभाग कुठलीही भूमिका घेत नसल्यामुळे मुळाकाठ परिसरातील काही तरूणांनी ना. विखे पाटील यांच्या घराकडे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. लोणीकडे मोठ्या संख्येने निघाले असता आंदोलकांना पानेगाव-मांजरी येथील मुळानदी पात्रावरील पुलावर पोलिसांनी रोखले.

यावेळी अधिकारी व आंदोलक यांच्यात पुन्हा चर्चा झाली. महसूल अधिकारी यांनी ना. विखे पाटील यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधत घटनेविषयी माहिती दिली. यावेळी आंदोलकांशीही विखे पाटलांनी फोनवर चर्चा केली. यावेळी ना.विखे पाटील यांनी महसुल अधिकार्‍यांना मुळाकाठ परिसरातील नदी पात्रातील वाळू लिलाव व डेपोची निविदा प्रक्रिया व उत्खनन करण्यास स्थगिती देण्यासंदर्भात सुचना दुरध्वनीवरून दिल्या.

मुळाकाठ परिसरातील नदीपात्रातील वाळु लिलाव होणार नाही असे प्रांतअधिकारी सुधिर पाटील यांनी जाहिर करताच ग्रामस्थांनी टाळ्याच्या गजरात निर्णयाचे स्वागत करत एकजुटीचा विजय असो अशा घोषणा दिल्या.

या आंदोलनाला आजी-माजी लोकप्रतिनीधीसह विविध पक्ष व संघटनेने आपला पाठिंबा जाहीर केला होता. वाळुच्या प्रश्नांवर राजकारणं विरहित मुळाथडी परीसरातील सर्वच गाव एकवटलेले दिसून आले.

आंदोलनामध्ये नेवासा तालुक्यातील अंमळनेर, निंभारी, करजगाव, पानेगाव, शिरेगाव, खेडलेपरमानंद, गोमळवाडी, वाटापूर, खुपटी तसेच राहुरी तालुक्यातील वांजुळपोई, तिळापूर, मांजरी तसेच मुळाकाठ परिसरातील गावांतील ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शेतकर्‍यांचा प्रश्नांवर राजकारणविरहित मुळाथडी परीसरातील सर्वच गावे एकत्र आली. वाळूमुळे पाणी टिकून आहे. यावरच परिसरातील शेतकरी टिकून आहे.

– दत्तात्रय घोलप, अध्यक्ष, मुळा पाणी आरक्षण कृती समिती

मुळाकाठ परिसरातील ग्रामस्थांनी नदीपात्रातील वाळूच्या संरक्षणासाठी मोठा संघर्ष केलेला आहे. वाळूमुळे परिसरातील पाण्याची पातळी टिकून आहे. यामुळे शेतकरी टिकून आहे. ही गोष्ट व ग्रामस्थांच्या भावना पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे व प्रशासनाला पटवून दिल्या. यापुढे परिसरातील वाळू लिलाव होणार नाही. असा शब्द दिल्याने ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.

– अशोकराव टेमक, माजी सरपंच, करजगाव

वाळू लिलाव व डेपो प्रश्नी मुळाकाठ परिसरातील सर्व गावांनी एकी दाखविल्यामुळे प्रशासनाला वाळु लिलाव रद्द करावा लागला.यामुळे अंमळनेर वरील भविष्यात होणार्‍या गंभीर संकटापासून सुटका झाली.

– ज्ञानेश्वर आयनर, सरपंच, अंमळनेर

- Advertisment -

ताज्या बातम्या