Wednesday, April 24, 2024
Homeनगरमुळा पाणलोटात पाऊस सुरूच

मुळा पाणलोटात पाऊस सुरूच

कोतूळ, भंडारदरा |वार्ताहर| Kotul | Bhandardara

पाणलोटात दोन दिवसांपासून पुन्हा पावसाचे प्रमाण वाढल्याने 7310 क्युसेकने आवक होत आहे. त्यामुळे 26000 दलघफू क्षमतेच्या धरणात काल शनिवारी सायंकाळी 6 वाजता 21914 दलघफू (84.28 टक्के) साठा झाला होता. रात्री उशीरा या धरणातील पाणीसाठा 22000 दलघफू पर्यंत सरकला.

- Advertisement -

तीन दिवसांपूर्वी पावसाने मुळाच्या पाणलोटातील हरिश्चंद्रगड, आंबित, पाचनई या भागात काहीशी विश्रांती घेतली होती. पण अधूनमधून बरसणार्‍या सरींमुळे धरणात नव्याने पाण्याची आवक सुरूच होती.

मुळा धरणात गत 24 तासांत 717 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. काल शनिवारी दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे सकाळी 6260 असणारा विसर्ग सायंकाळी कोतूळ येथे 7310 क्युसेकपर्यंत वाढला होता. मुळा धरणात काल सायंकाळी संपलेल्या 12 तासांत 312 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले.

दरम्यान, अकोले तालुक्याच्या अन्य भागातही पाऊस कोसळत असल्याने तालुक्यातील देवठाण येथील आढळा धरण तुडुंब झाले आहे. काल सायंकाळी 1060 दलघफू क्षमतेच्या या धरणातील पाणीसाठा शनिवारी रात्री 1020 दलघफू पर्यंत पोहचला होता. आज रविवारी दुपारपर्यंत हेही धरण ओसंडून वाहण्याची शक्यता आहे. बेलापूर बदगी येथील 94.58 दलघफू क्षमतेचा तलाव ओव्हरफ्लो झाला आहे.

भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याने येणारी आवक निळवंडे धरणात सोडण्यात येत आहे. पाणलोटात कालही पाऊस कोसळत होता. त्यामुळे गत सायंकाळी संपलेल्या 12 तासांत भंडारदरा धरणात 280 दलघफू पाणी आले. ते पाणी निळवंडेत सोडण्यात आले. निळवंडेत पाणीसाठा 7176 दलघफू झाला असून 5426 क्युसेकने पाणी प्रवरा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. ओझर ओव्हरफ्लो 5711 क्युसेकने सुरू आहे.

डिंभे 87, घोडमध्ये 81 टक्के पाणीसाठा

दक्षिण नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या कुकडी धरण समुहातील धरणांमधील पाणीसाठा दिवसागणिक वाढत आहे. डिंभे धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. या धरणातील पाणीसाठा काल शनिवारी सकाळी 10900 द्लघफू (87 टक्के) झाला होता. सुमारे बाराशे दलघफू क्षमतेच्या वडज धरणातील पाणीसाठा 1089 दलघफू (92.85 टक्के) होता. पाण्याची आवक होत असल्याने या धरणातून मीना नदीत व कालव्यात पाणी सोडण्यात येत आहे.

पिंपळगाव जोगे धरणात 927 दलघफू पाणीसाठा या धरणात असून माणिकडोहमध्ये 3570 दलघफू (35.10 टक्के) पाणी आहे. घोड धरणातील पाणीही वाढत असून 4810 दलघफू (81 टक्के)पाणीसाठा झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या