Thursday, April 25, 2024
Homeनगरशासनाआधी ‘मुळा’ देणार सव्वातीन कोटींचे अनुदान - ना. गडाख

शासनाआधी ‘मुळा’ देणार सव्वातीन कोटींचे अनुदान – ना. गडाख

नेवासा |प्रतिनिधी| Newasa

संपूर्ण उसाचे गाळप होईपर्यंत कारखाने बंद करू नयेत असे शासनाने आदेश दिले. मात्र 1 मे नंतर कारखाना चालवावे लागल्याने साखर उतार्‍यात घट येऊन कारखान्यांचे जे नुकसान होते त्याची भरपाई देण्याचे धोरण महाराष्ट्र शासनाने घेतले आहे याअगोदरच नामदार शंकरराव गडाख यांनी वाढदिवसानिमित्त सुमारे 6 हजार शेतकर्‍यांना सव्वातीन कोटी रुपये अनुदान मुळा कारखान्याच्यावतीने वाटप करण्याच्या निर्णय घेतला असून यानंतर शासनाचे अनुदान या शेतकर्‍यांना मिळणार आहे

- Advertisement -

अतिरिक्त ऊस झाल्याने ज्या शेतकर्‍यांचा ऊस उशीरा गाळप झाला त्यांनाही जी आर्थिक झळ बसली ती विचारात घेऊन मुळा कारखान्याने अशा शेतकर्‍यांना दिलासा देण्याच्यादृष्टीने अनुदान वाटप करण्याचा निर्णय घेऊन दि. 16 एप्रिलपासून पुढे गाळप झालेल्या जवळपास 6 हजार शेतकर्‍यांना सव्वातीन कोटींचे अनुदान वाटप करण्याचा निर्णय झाला.

चालू हंगामात मुळा कारखान्याने जवळपास 15 लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठरवले होते. हे उद्दिष्ट पूर्ण करतानाच कोणत्याही शेतकर्‍यांचा ऊस गाळपाविना शेतात उभा राहणार नाही याप्रमाणे नियोजन करण्याच्या सूचना कारखान्याचे मार्गदर्शक नामदार शंकरराव पाटील गडाख यांनी संचालक मंडळ व अधिकार्‍यांना दिल्या होत्या. कारखान्याच्या दैनंदिन गाळप क्षमतेतही वाढ करण्यात आली होती. येत्या 5-6 दिवसात शिल्लक संपूर्ण ऊसाचे गाळप पूर्ण झाल्यावर कारखान्याचा हंगाम बंद करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेवटच्या तीन पंधरवाड्यात ज्या शेतकर्‍यांचा ऊस गळीताला आला त्यांना जी आर्थिक झळ बसलेल्या शेतकर्‍यांना आर्थिक दिलासा देणं गरजेचे होते. म्हणून त्याबाबत नामदार शंकरराव गडाख पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनुदान वाटपाचा निर्णय संचालक मंडळाने घेऊन रविवारी नामदार गडाख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अनुदान वाटप एकाच दिवशी रोखीने देण्याचा निर्णय घेतला. या अनुदानातून कोणतीही कपात न करता अनुदानाची रक्कम रोख अदा केली असल्याचे तुवर यांनी सांगितले. 16 ते 30 एप्रिल पर्यंत गाळप झालेल्या ऊसाला प्रति टन 75 रुपये तर 1 मे पासून पुढे गळीतास असलेल्या ऊसाला प्रति टन 150 रुपये अनुदान दिले जाणार असल्याचे तुवर म्हणाले.

कार्यक्रमप्रसंगी प्रतिनिधिक स्वरूपात पाच गावातील शेतकर्‍यांना कारखान्याच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाच्या हस्ते अनुदान वाटप करण्यात आले. कार्यक्रम संपल्यानंतर उर्वरित शेतकर्‍यांना गटवार टेबल मांडून रोख अनुदान वाटप करण्यात आले.

नामदार शंकरराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त कारखाना कार्यस्थळावर विविध प्रकारची 52 झाडे कारखान्याचे पदाधिकारी, संचालक, अधिकारी व ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या हस्ते लावण्यात आली.

कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कारखान्याचे सर्व संचालक अधिकारी व ऊस उत्पादक शेतकरी व कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या