Saturday, April 27, 2024
Homeनगरमुळा, डिंभे प्रत्येकी 75 टक्के भरले !

मुळा, डिंभे प्रत्येकी 75 टक्के भरले !

कोतूळ भंडारदरा |वार्ताहर| Kotul| Bhandardara

पाणलोटात दोन दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले असलेतरी अधूनमधून बरसणार्‍या सरींमुळे धरणात नव्याने पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे 26000 दलघफू क्षमतेच्या या मुळा धरणात 5668 क्युसेकने आवक होत असल्याने काल मंगळवारी सायंकाळी 6 वाजता 19579 दलघफू (75.30 टक्के) पाणीसाठा झाला होता.

- Advertisement -

कुकडी प्रकल्पातील सर्वाधिक क्षमतेचे डिंभे धरणातील पाणीसाठा सकाळी 75 टक्के झाला होता. साडेदहा टीएमसी क्षमता असलेल्या डिंभे धरणात पाण्याची आवक होत असल्याने मंगळवारी सकाळी या धरणातील पाणीसाठा 9454 दलघफू (75.66 टक्के) झाला होता.

भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याने येणारी आवक निळवंडे धरणात सोडण्यात येत आहे. काल सायंकाळी भंडारदरातून 4396 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. तर निळवंडेतील 6880 दलघफू पाणी कायम ठेवून 5548 क्युसेकने पाणी प्रवरा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास विसर्ग वाढविण्यात येणार आहे.

त्यामुळे प्रवरा नदीकाठी सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. निळवंडे धरणातही काल सायंकाळी 7 वाजता पाणीसाठा 6850 दलघफू (82 टक्के) झाला आहे. या धरणातून 1993 क्युसेकने पाणी प्रवरा नदी पात्रात सोडण्यात येत आहे. हा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचे आदेश पाटबंधारे विभागाने दिले आहेत.

वडज 90, घोडमध्ये 68 टक्के पाणीसाठा

दक्षिण नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या कुकडी धरण समुहातील धरणांमधील पाणीसाठा समाधानकारक झाला आहे. या प्रकल्पात सुमारे 60 टक्के पाणीसाठा झाला आहे. साडेदहा टीएमसी साठवण क्षमता असलेले डिंभे धरणातील पाणीसाठा काल 75.66 टक्के नोंदवला गेला. सुमारे बाराशे दलघफू क्षमतेचे वडज धरणातील पाणीसाठा 1048 दलघफू (90 टक्के) पाणीसाठा होता. पाण्याची आवक होत असल्याने या धरणातून मीना नदीत व कालव्यात पाणी सोडण्यात येत आहे. माणिकडोह आणि पिंपळगाव जोगे धरणातही आवक होत आहे. पिंपळगाव जोगे धरणात मृत पाणीसाठा होता तो आता उपयुक्त साठ्यात आला आहे. 481 दलघफू पाणीसाठा या धरणात असून माणिकडोडमध्ये 3077 दलघफू (30.24 टक्के) पाणी आहे. घोड धरणातील पाणीही वाढत असून 4095 दलघफू ( 68.51 टक्के) पाणीसाठा झाला आहे. कुकुडी प्रकल्प जुन्नर, शिरूर, पारनेर, नगर, श्रीगोंदा आदी तालुक्यांना वरदान ठरलेला आहे. त्यामुळे या भागातील शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या