Saturday, April 27, 2024
Homeनगरमुळा, भंडारदरा, दारणाच्या पाणलोटात जोरदार पाऊस

मुळा, भंडारदरा, दारणाच्या पाणलोटात जोरदार पाऊस

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

दारणाच्या पाणलोटातील घोटी, इगतपुरी च्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान दारणाचा साठा 40 टक्क्यांच्या पुढे सरकला आहे. दारणाचा उपयुक्त साठा 3 टिएमसी इतका झाला आहे.

- Advertisement -

दारणाच्या पाणलोटातील विशेष करुन घोटी तसेच इगतपुरी भागात दोन दिवसांपूर्वी पुन्हा पावसाचे जोरदार आगमन झाले. शुक्रवारी पावसाची संततधार होती. काल शनिवारी पावसाचा जोर काहिसा वाढला. त्यामुळे दारणात नवीन पाण्याची चांगली आवक होवू शकते. 1 जून पासून काल सकाळ पर्यंत दारणात 2 टिएमसीहुन अधिक नवीन पाणी दाखल झाले आहे. दारणाच्या वरील असलेला भावली प्रकल्पाच्या पाणलोटातही मुसळधार पावसाचे आगमन होत आहे. भावली 42 टक्क्यांच्या पुढे काल सकाळी 6 वाजता सरकले होते.

काल रात्रीतून हा साठा 45 टक्क्यांहून अधिक झालेला असेल. दारणाच्या पाणलोटातील इगतपुरीला काल सकाळी 6 पर्यंत मागील 24 तासात 103 मिमी पावसाची नोंद झाली. घोटीचीही हिच स्थिती आहे. भावली धरणाच्या भिंतीजवळ 131 मिमी पावसाची नोंद झाली. तर दारणाच्या भिंतीजवळ 12 मिमीची नोंद झाली. काल सकाळच्या आकडेवारीनुसार 7149 दशलक्षघनफुट क्षमतेच्या दारणात 2835 दशलक्षघनफुट पाणीसाठा झाला होता. काल दिवसभरातील व रात्रीतून दाखल होणारे पाणी जास्त असेल. हा साठा पुढे सरकलेला असेल.

मुकणे धरणाचा साठा 46.73 टक्क्यावर पोहचला आहे. मुकणेला काल 18 मिमी पावसाची नोंद झाली. वाकी ला 42 मिमी पावसाची नोंद झाली. वाकी 1.93 टक्के इतका आहे. भामला 62 मिमी पावसाची नोंद झाली. भाम 8.20 टक्के, भावली 42.33 टक्के, वालदेवी 19.15 टक्के, असे पाणी साठे धरणात आहेत.

गंगापूर धरणाच्या पाणलोटात दारणाच्या तुलनेत पावसाचे प्रमाण काहिसे कमी आहे. गंगापूर च्या भिंतीजवळ अवघा 9 मिमी पाऊस झाला. तर पाणलोटातील त्र्यंबक येथे 29 मिमी, अंबोली येथे 49 मिमी, असा पाऊस नोंदला गेला. गंगापूरचा पाणीसाठा 30.38 टक्के इतका आहे. 5630 क्षमतेच्या या धरणात 1736 दलघफू पाणीसाठा आहे. गंगापूर समुहातील कश्यपीचा साठा 15.50 टक्के, गौतमी गोदावरीचा 11.24 टक्के, कडवा 21.15 टक्के, आळंदीचा 1.47 टक्के पाणीसाठा आहे.

या पावसाचे आगमन घाटमाथ्यावर चांगले होत आहे. मात्र अन्यत्र पावसाचा जोर अल्प आहे. तुडूंब भरलेल्या नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात पावसाचे पाणी नव्याने दाखल होत असल्याने बंधार्‍यातून 500 क्युसेकने गोदावरी नदीत विसर्ग सुरु आहे.

जायकवाडीत 27 टक्के उपयुक्त जलसाठा !

पाणलोटातील पावसाने 1 जून पासून जायकवाडी जलाशयात 1.3 टिएमसी पाणी नव्याने दाखल झाले. जायकवाडीत उपयुक्तसाठा 20.5 टिएमसी म्हणजेच 26.8 टक्के आहे. मृतसह एकूण साठा 46.6 टिएमसी इतका आहे. म्हणजेच 45.42 टक्के साठा आहे.

मुळात पाण्याची आवक सुरू

कोतूळ |वार्ताहर| Kotul

मुळा धरणात प्रथमच नवीन पाण्याची आवक सुरू झाली आहे. काल सकाळपर्यंत या धरणात 58 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. 26000 दलघफू क्षमतेच्या धरणात काल सकाळी 9276 दलघफू पाणीसाठा झाला होता. 3822 क्युसेकने आवक सुरू आहे.

तीनचार दिवसांपूर्वी पाणलोटातून पाऊस गायब झाल्याने पाणलोटासह लाभक्षेत्रात चिंतेचे वातावरण होते. पण या भागातील नूर शुक्रवारपासून बदलला. रिपरिप सुरू असल्याने मुळा नदी 1000 क्युसेकने वाहत होती. पण शुक्रवारी रात्री पावसाचा जोर वाढल्याने कोतूळ येथील मुळा नदीचा विसर्ग 3822 क्युसेक होता.

गत आठवड्यात पाऊस झाल्याने सुरवातील आंबित बंधारा ओव्हरफ्लो झाला. त्यानंतर तीन चार दिवसांत 600 दलघफू क्षमतेचे पिंपळगाव खांड हे धरण भरले. त्यानंतर पाणी राहुरी तालुक्यातील मुळा धरणाकडे झेपावले. पण त्यानंतर पावसाचा जोर मंदावला. पुढे तो गायबही झाला. त्यामुळे पाणी धरणात पोहचण्यास उशीर होत होता. पण आता पाऊस सुरू झाल्याने धरणात नवीन पाणी येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या