Sunday, April 28, 2024
Homeनगरमोहरमच्या पार्श्वभूमीवर 650 गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई

मोहरमच्या पार्श्वभूमीवर 650 गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर शहरात मोहरम उत्सवास सुरूवात झाली असून शुक्रवारी कत्तलची रात्र मिरवणूक व शनिवारी मोहरम विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील सुमारे 650 व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. संबंधित व्यक्तींना नोटिसा पाठविण्यात आल्या असून त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्रही लिहून घेतले आहे.

- Advertisement -

कोठला भागात छोटे बारा इमाम व बडे बारा इमाम यांची सवारी मिरवणूक शुक्रवारी रात्री काढण्यात येते. त्याला कत्तलची रात्र मिरवणूक म्हणतात. ही मिरवणूक शुक्रवारी रात्री 12 वाजता कोठला येथून निघणार असून पुढे कोंड्यामामा चौक, दाळ मंडई कॉर्नर, तेलीखुंट, कापडबाजार, मोची गल्ली, भिंगारवाला चौक, अर्बन बँक रस्ता, घुमरे गल्ली, लक्ष्मीबाई कारंजा, पटवर्धन चौक, जुना कोर्ट रस्ता, सबजेल चौक, जुनी महानगरपालिका, जुना बाजार, रामचंद्र खुंट मार्गे पुन्हा कोठला येथे शनिवारी सकाळी येणार आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता विसर्जन मिरवणुकीला कोठला येथून सुरूवात होणार आहे. ही मिरवणूक कोठला, कोंड्यामामा चौक, पिंजार गल्ली, जुना कापडबाजार, ख्रिस्त गल्ली, बांबू गल्ली, पंचपीर चावडी, जुनी महापालिका, कोर्ट गल्ली, चौपाटी कारंजा, दिल्लीगेट, बालिकाश्रम रस्ता मार्गे सावेडी गावात विसर्जित होणार आहे.

दरम्यान, मिरवणुकीच्यावेळी गैरप्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून सुमारे 650 व्यक्तींवर प्रतिबंधक कारवाई केली आहे. किरकोळ स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या शहरातील 91 व्यक्तींना सीआरपीसी 107 प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे. त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले आहे. यामध्ये कोतवाली 71, तोफखाना 10 व भिंगार कॅम्प हद्दीतील 10 व्यक्तींचा समावेश आहे. गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या 16 गुन्हेगारांना सीआरपीसी 110 प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे. त्यांच्याकडूनही प्रतिज्ञापत्र लिहून घेतले आहे.

यामध्ये कोतवाली हद्दीतील 14 व तोफखाना हद्दीतील दोन गुन्हेगारांचा समावेश आहे. गैरवर्तन करण्याची शक्यता असणार्‍या 177 व्यक्तींना सीआरपीसी 149 प्रमाणे नोटीस देण्यात येणार आहेत. यामध्ये कोतवाली हद्दीतील 130, तोफखाना हद्दीतील 25 तर भिंगार हद्दीतील 22 व्यक्तींचा समावेश आहे. मोहरम काळात गैरवर्तन केल्यास अशा व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

365 तीन दिवसांसाठी हद्दपार

मोहरम मिरवणूक मार्गात अडथळा निर्माण होणार नाही यासाठी नगर शहर हद्दीतून 365 व्यक्तींना तीन दिवसांसाठी हद्दपार करण्यात येणार आहे. त्यांना सीआरपीसी 144 (2) प्रमाणे नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना मोहरम मिरवणुकीच्या वेळी हद्दीतून हद्दपार करण्यात येणार आहे. यामध्ये कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतून 137, तोफखाना पोलीस ठाणे हद्दीतून 148 तर भिंगार पोलीस ठाणे हद्दीतून 80 व्यक्तींना हद्दपार केले जाणार आहे.

मातम मिरवणूक संपन्न

काल (बधुवार) सकाळी मोहरमनिमित्त शिया पंथाच्या लोकांकडून मातम मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक तेलीखुंट, बेलदार गल्ली, ग्राहक भंडार, मच्छी मार्केट, हवेली, राजचेंबर मार्गे कोठला अशी काढण्यात आली. यामध्ये सुमारे 50 ते 60 शिया पंथाचे लोक सहभागी झाले होते. यावेळी तोफखाना, कोतवाली पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता.

शांतता कमिटीची बैठक

मोहरम उत्साहात साजरा व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहे. यासाठी बुधवारी सकाळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेेंद्र पाटील, पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर अधीक्षक प्रशांत खैरे, उपअधीक्षक अनिल कातकडे यांच्या मार्गर्शनाखाली शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. मिरवणूक मार्गावरील रस्ते दुरूस्ती करणे, अतिक्रमण काढणे, विद्युत सुविधा याबाबत चर्चा करण्यात आली. संबंधित विभागाला सूचना करण्यात आल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या