Thursday, April 25, 2024
Homeनगरमहावितरणचा लोणीचा लाईनमन लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडला

महावितरणचा लोणीचा लाईनमन लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडला

लोणी |वार्ताहर| Loni

महावितरणच्या लोणी कार्यालयाचा असिस्टंट लाईनमन साडेचार हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडला.

- Advertisement -

त्याने आडगाव खुर्द येथील नागरिकाकडून घराची वीजजोडणी देण्यासाठी लाच मागितली होती.

नवनाथ नामदेव निर्मळ (वय 43), रा. पिंपरी निर्मळ, ता. राहाता हा असिस्टंट लाईनमन म्हणून महावितरणच्या लोणी-2 कार्यालयात सेवेत होता. आडगाव खुर्द येथील नागरिकाने आपल्या वडिलांच्या नावाने या कार्यालयाकडे घराच्या वीज जोडणीसाठी कोटेशन भरले होते.

पण नवनाथ निर्मळ याने त्यांच्याकडे वीज जोडणी व मिटर बसवण्यासाठी 4 हजार 500 रुपयांची लाच मागितली. या नागरिकाने जागरूकता दाखवत नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आणि सोमवार दि. 8 फेब्रुवारी रोजी लोणी येथील हॉटेल साईछत्र येथे सापळा लावून निर्मळ याला लाच स्वीकारताना पंचासमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले.

पोलीस अधीक्षक सुनील कडासने, निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत विभागाचे सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक श्याम पवरे, पर्यवेक्षण अधिकारी उपअधीक्षक हरीश खेडकर, पोलीस हवालदार तन्वीर शेख, प्रशांत जाधव, चौधरी, विजय गंगुल, रवींद्र निमसे, वैभव पांढरे, राधा खेमनर, संध्या म्हस्के, हरून शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपी नवनाथ निर्मळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या