Friday, April 26, 2024
Homeनगरमृग नक्षत्राने फिरवली पाठ; पेरण्या खोळंबल्या, शेतकरी चिंतेत!

मृग नक्षत्राने फिरवली पाठ; पेरण्या खोळंबल्या, शेतकरी चिंतेत!

चांदा | Chanda

यंदा वेळेवर मान्सुनचे आगमन झाले. त्यामुळे कधी नव्हे तो बळीराजाच्या चेहर्‍यावर हसू दिसले. यंदा खरीप अगदी वेळेवर सुरू होणार या आशेने बळीराजा दुप्पट जोमाने कामाला जुंपला पण झाले भलतेच. ज्या नक्षत्रावर सर्वात जास्त भरवसा असतो त्या मृग नक्षत्रानेच पाठ फिरविल्याने आता खरीप हंगाम पुन्हा एकदा लांबणार का? अशी भीती शेतकर्‍यांना वाटू लागली आहे .

- Advertisement -

नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व सरी कोसळल्या. नेवासा तालुक्यातील मोजक्याच भागात थोड्याफार प्रमाणात मान्सूनपुर्व पाऊस झाला. मात्र तालुक्यातील दक्षिणेकडील चांदा, बर्‍हाणपूर, कौठा, म्हाळसपिंपळगाव, लोहारवाडी, मांडेमोरव्हाण, फत्तेपूर, रस्तापूर, महालक्ष्मीहिवरे आदी भागात मात्र पेरणीयोग्य पाऊस झालाच नाही. सात जूनला मृग नक्षत्र सुरू होते. या काळात धो धो पाऊस पडून काळी आईच्या मातीचा सुगंध आसमंतात दरवळतो. आणि बळीराजा खरिपाच्या पेरणीला सज्ज होत असतो.

मात्र यंदा असे घडलेच नाही. मृग संपत आला तरी पाऊस आलाच नाही. मागील आठवड्यात पाऊस येईल अशी शक्यता होती मात्र ती फोल ठरली. या आठवड्यात तर पुन्हा एकदा उकाडा सुरू झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे या परीसरात कपाशी, बाजरी, तूर, मका,ृ कांदा, सोयाबीन, मूग आदी पिकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. चांदा-बर्‍हाणपूर, कौठा, रस्तापूर परिसरात कपाशीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मे महिन्याच्या शेवटच्या किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात कपाशी लागवड केल्यास चांगले उत्पन्न मिळते असा शेतकर्‍यांना विश्वास असतो मात्र आता जुनचा दुसरा आठवडा सुरू झाला तरीही लागवड झाली नाही. कपाशी बरोबरच लाल कांदा, तूर, सोयाबीन आदी पिकांची पेरणी खोळंबली आहे.

मुळा उजव्या कालव्याचे आवर्तन सध्या सुरू आहे. त्या लाभक्षेत्रात येणार्‍या बहुतांशी शेतकर्‍यांनी कपाशी लागवड केली आहे. मात्र इतर पिकाची पेरणी झालेली नाही. चांदा आणि परिसरात मुळा उजव्या कालव्याच्या भरवशावर साधारणपणे तीस ते पस्तीस टक्केच कपाशी लागवड झाली आहे. अजूनही मोठे क्षेत्र पावसाच्या प्रतिक्षेत आहे. या भागात गतवर्षी चांगला पाऊस झाला होता. मात्र यंदाची सुरुवात चांगली झाली नसल्याने शेतकरी आभाळाकडे डोळे लाऊन बसले आहेत. या आठवड्यात पाऊस झाला तर पेरणी करता येणार आहे.

मात्र जर पाऊस लांबला तर खरिपाच्या पेरण्या उशिराच होतील. त्यामुळे उत्पन्न घटण्याची भीती शेतकर्‍यांना वाटत आहे. त्यातच कहर म्हणजे खरिपासाठी आवश्यक असणारी युरिया सारखे खत या भागातून गायब झाल्याने युरियासाठी शेतकर्‍यांना वाट पाहावी लागत आहे. कृषी विभागाने या परिसरात मुबलक खतसाठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

…तर आवर्तन सोडण्याची गरज

मुळा उजव्या कालव्याचे सध्या आर्वतन सुरू आहे मात्र या परिसरातील पाटचार्‍या आता बंद झाल्या आहेत त्यामुळे कपाशी लागवड केलेले क्षेत्र, ऊस, चार्‍याची मका आदी पिकांना पाण्याची गरज आहे. कपाशीसारखे पीक आता सुकूलागले आहे. जर पाऊस आला नाही तर पुन्हा पाटचार्‍यांचे रोटेशन करण्याची अत्यंत गरज आहे. तरच ही पिके तग धरू शकतील अशी परिस्थिती आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या