Friday, April 26, 2024
Homeराजकीयप्रशासनाला स्वातंत्र्य नसल्यानेच संगमनेरमध्ये करोना संसर्गात वाढ

प्रशासनाला स्वातंत्र्य नसल्यानेच संगमनेरमध्ये करोना संसर्गात वाढ

अहमदनगर (प्रतिनिधी) – संगमनेरमध्ये करोना रुग्णांची होत असलेली वाढ हे प्रशासनाचे अपयश आहे. मात्र, प्रशासनाला संगमनेरमध्ये काम करू दिले जात नाही. त्यांना कामाचे स्वातंत्र्य नाही, लोकप्रतिनिधींकडून त्यांच्या कामात अडचणी निर्माण केल्या जात आहेत, त्यामुळे संगमनेरची वाटचाल मालेगावसारखी होत आहे, अशी टीका खा. डॉ. सुजय विखे यांनी केली.

संगमनेरमधील वाढत्या संख्येच्या करोना रुग्णांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तेथे आता स्वतंत्र जिल्हाधिकारी नियुक्त करावा, म्हणजे परिस्थिती नियंत्रणात येईल, असा टोलाही त्यांनी महसूलमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता त्यांनी लगावला.

- Advertisement -

दरम्यान, जिल्हा परिषदेकडून खासदारांच्या अधिकारावर अतिक्रमण केले जात आहे. केंद्र सरकारच्या योजनांचे आराखडेही परस्पर मंजूर केले जात आहेत. आराखडे तयार करताना खासदारांना दाखवले जात नाहीत. केंद्र सरकारच्या अनेक योजनेतील कामे हे केवळ राजकीय कारणातून मंजूर केले जातात, प्रशासनाने यापुढे लोकप्रतिनिधींचा सन्मान ठेवावा, यापुढे आपण हे चालू देणार नाही, असा इशारा खा. डॉ. विखे यांनी दिला.

खा. डॉ. विखे यांनी काल जिल्हा परिषदेमध्ये केंद्र सरकार पुरस्कृत योजनांचा आढावा घेतला. खासदारांना न कळवता केंद्र सरकारच्या योजनेतील कामांचे यापुढे परस्पर लोकार्पण झाल्यास आपण याबाबत तक्रार करू, असा इशाराही त्यांनी दिला. जिल्हा परिषदेत ते पत्रकरांशी बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकीकडे अनलॉक सुरु असल्याचे सांगतात, मात्र दुसरीकडे लॉकडाऊन हटवले नसल्याचे सांगतात. याचा अर्थ सरकारमध्ये संभ्रमावस्था आहे, महाराष्ट्रातल्या मंत्र्यांचे ब्रेन लॉक झाले आहेत, अनलॉक काय करावे व लॉकडाऊन काय करावे हेच त्यांना समजेनासे झाले आहे. महाविकास आघाडी सरकारचे व्यवस्थापनच सपशेल चुकल्याने महाराष्ट्रातील करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, असा आरोपही खा. डॉ. विखे यांनी केला.

मी व माजी आमदार शिवाजी कर्डिले एकाच पक्षात आहोत. विखे गट स्वतंत्र असणार नाही. जे काही विखेंचे कार्यकर्ते असतील ते भाजपमध्येच असतील. एकीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी बरोबरही राहायचे आणि विखे यांच्याबरोबरही राहायचे, असे यापुढे चालणार नाही. मी व कर्डिले नगर तालुक्याचा एकत्र दौरा करणार आहोत, दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांच्या एकत्रीकरणाचा प्रयत्न करून मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करू. जो माझ्याशी संलग्न तो भाजपशी संलग्न असेल, असा दावाही खा. विखे यांनी केला.

भाजपचे आ. गोपीनाथ पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर केलेल्या टिकेसंदर्भात बोलताना खा. डॉ. विखे म्हणाले की, पवार ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याविषयी अशा पद्धतीने बोलणे योग्य नाही. चीन बनावटीचे 59 अ‍ॅपवर बंदी घालण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणावर टीका करताना काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नमो अ‍ॅपवरही बंदी घालण्याचे आवाहन केले, त्यासंदर्भात बोलताना खा. विखे म्हणाले, जनतेने नाकारल्याने काँग्रेसच्या नेत्यांमध्ये नैराश्य पसरले आहे. तर नमो अ‍ॅप भारतीय बनावटीचे व आत्मनिर्भर बनवणारे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या