Friday, May 10, 2024
Homeनगरभगदाड पडलेल्या पुलाच्या बांधकामाच्या आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित

भगदाड पडलेल्या पुलाच्या बांधकामाच्या आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

टाकळीभान ते गणेशखिंड या भंडारदरा कालव्यावरील मैल क्रमांक 42 मधील 110 वर्षांपूर्वीच्या व वर्दळीच्या पुलावर पडलेले भगदाड बुजवण्यात संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याने या पुलाचे त्वरीत बांधकाम करावे, अन्यथा श्रीरामपूर नेवासा राज्यमार्गावर भव्य आंदोलन छेडले जाईल, असा इशारा माजी सभापती डॉ. वंदना मुरकुटे यांनी या पुलावर केलेल्या ठिय्या आंदोलनप्रसंगी बोलताना दिला.

- Advertisement -

यावेळी खिर्डीचे माजी उपसरपंच भाऊसाहेब पारखे, गुजरवाडीचे रामभाऊ कवडे, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रा. कार्लस साठे, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे, शिवाजी जाधव, संदीप चितळकर, जलसंपदाचे शाखा आभियंता महेश शेळके, सा. बां. विभागाचे शाखा आभियंता रणजित तमखडे, विलास आठरे यावेळी उपस्थित होते.

टाकळीभान गणेशखिंड या रस्त्यावरील भंडारदरा धरणाच्या कालव्याच्या पुलाला गेल्या दोन महिन्यांपासून रस्त्याच्या मधोमध भगदाड पडल्याने या वर्दळीच्या मार्गावरील वाहतूक बंद आहे. त्यामुळे प्रवाशांसह व शाळकरी मुलांना त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी माजी सभापती डॉ. वंदना मुरकुटे यांनी काल मंगळवारी भगदाड पडलेल्या पुलावर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. यावेळी परीसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

यावेळी डॉ. मुरकुटे म्हणाल्या, दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही संबंधित विभागाने पुलाच्या दुरुस्तीची दखल घेतली नाही. त्यामुळे प्रवाशांचे, शेतकर्‍यांचे व शाळकरी मुलांचे प्रचंड हाल होत आहेत. शासनाकडून याबाबत दुर्लक्ष होत असून या कामासाठी आता राज्यमार्गावर रास्तारोको आंदोलन हाती घेतले जाईल. उपस्थित संबंधित अधिकार्‍यांनी पुलाच्या दुरुस्तीच्या कामाचे ठोस आश्वासन दिल्याशिवाय ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही, असेही त्यांनी निक्षून सांगितले.

जलसंपदा विभागाचे बेलपिंपळगाव शाखेचे अभियंता महेश शेळके यांनी, एक महिन्यात पुलाचे बांधकाम करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर सुमारे दीड तास सुरू असलेले ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. या मार्गावरील वाहतूक हा जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने संबंधित विभागाकडून ठोस आश्वासन घेण्यासाठी आंदोलक आक्रमक झाले होते. जलसंपदाचे शेळके व सा. बां.चे तमखडे यांनी निवेदन स्विकारले.

यावेळी राजेंद्र कोकणे, प्रा. कार्लस साठे, भाऊसाहेब पारखे, भास्कर तुवर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बापूसाहेब शिंदे, बंडोपंत बोडखे, संदीप तुवर, हरिभाऊ जगताप, सुभाष तुवर, दिगबर मगर, चिलीया तुवर, दत्तात्रय जाधव आदींसह टाकळीभान, खिर्डी, वांगी, गुजरवाडी, भेर्डापूर, कारवाडी परीसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या