Blog : मातृत्व…

jalgaon-digital
8 Min Read

कविता, मंगल, सुजाता एसटी स्टँडवर सगळ्या माझी वाट बघत बसल्या होत्या. मी गाडीवरून उतरताच सगळ्या माझ्या भोवती जमा झाल्या. “काय ग खूप वेळ झाला यायला, चल लवकर बस येईलच आता” असे म्हणून मंगलने माझ्या हातातून बॅग घेतली. मी पण किशोरला म्हणजे माझे मिस्टरांना बाय केले, “काळजी घ्या सगळ्यांनी” असे म्हणत तो ही घराकडे निघाला, आम्ही सगळ्या मैत्रिणी खूप उत्साहात होतो, आज खूप दिवसानंतर आम्ही भेटणार होतो दिवसानंतरच काय तर खूप वर्षांनंतर….

नांदगाव आमच्या सगळ्यांचच माहेर म्हणून सर्वांनी नांदगावला जमून पहाटे पाचच्या बसणे मनमाडला जायचं ठरलं आणि तिथून रेल्वेने मुंबईला निघायचं. सुजाताने ऑनलाइन तिकीट बुकिंगही केले होते मुंबईचे.

पहाटेचे पाच वाजले होते स्टँडवर भयाण शांतता होती, त्यात मंगलची बडबड चालू झाली. तिची बडबड चालू झाली की, संपायची नाही. तिच्याकडे नेहमी सुर्यफुलाच्या बीया असायच्या, कविताने गमतीने विचारले “काय ग मंगल बीया तर आणल्याय ना” आम्ही सर्व मोठ्याने हसायला लागलो.

तेवढ्यात बस आली आम्ही बसमध्ये चढलो बस रिकामी होती. कविता आणि मंगल एका सीटवर बसल्या आणि मागच्या सीटवर मी आणि सुजाता बसले.

“काय ग कोणी मुग्धा ला फोन केला का” कविताने डोक्यावर असलेल्या बसच्या कॅरीत बॅग कोंबत विचारले.

मी मध्येच बोलली अगं मनमाडच्या स्टेशन वर यायला निघाली ती, फोन केला मी तिला, बस सुरू झाली आणि आमच्या गप्पांचा प्रवास देखील.

लहानपणीच्या सगळ्या गमती प्रत्येकीने आळीपाळीने सांगितल्या, त्यातच सुजाता बोलली आपली शेवटची भेट कोणाला आठवते? मी तिच्या डोक्यावर टपली मारत तिला बोलली “खूप काही वर्ष नाही झाले आपल्या भेटीला, पाच वर्ष तर झालेत.

12 वी चा शेवटचा पेपर होता, पेपर सुटल्यावर आपण सर्व वर्गाच्या बाहेर पडलो. नुकतच लग्न ठरलेल होत मुग्धाच तिच्या कडून आपल्याला चहा पार्टी घ्यायची होती. आपण रस्त्याच्या कडेला कॅन्टीनकडे वळालोच होतो की, मागुन एक भरधाव येणाऱ्या ट्रकने रस्त्याच्या कडेला असलेला कापडी तंबू चिरटून टाकला होता.

कॉलेजमधून सर्व सर विद्यार्थी, कॅन्टीगमधील लोक, आजुबाजुचे दुकानदार सर्वच त्याठिकाणी धावून गेले, आम्ही ही पळत सुटलो तिकडे, तंबुमध्ये राहणार जोडप जागीच ठार झाल होत, त्यांच्या रक्ताचा सडा रस्त्यावर पडलेला होता आणि त्याच वेळी त्याचा दोन वर्षांचा मुलगा, त्याच्या आई बाबांच्या प्रेताजवळ येवुन मोठमोठ्याने रडत त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत, त्याच रक्ताच्या थारोळ्यात बसला होता.

हृदय पिळवटून टाकणार ते विदारक दृश्य, सांगता सांगता माझ्या डोळ्यात पाणी आलं. विषय बदलायचा म्हणून माझं बोलणं मध्येच तोडत कविता बोलली. “अग हो त्यावेळी मुग्धाकडून पार्टी राहिली ना घ्यायची आणि त्या घटनेचा फायदा घेत ती गायब झाली जाऊ दे आता भेटू दे तिला कानच धरते तिचे.

त्यावर सुजाता व मंगल हसायला लागल्या पण मी वेगळ्याच विचारात गढुन गेले. मला चांगलच आठवत, आम्ही कॉलेजला यायचो तेव्हा त्या तंबूत जवळुच यायचो मुग्धाला तो छोटासा मुलगा खूप आवडायचा.

ती येता-जाता त्या मुलाचे गाल धरायची, मातीने आणि घामाने बरबटलेल्या त्या बाळाची आम्हाला किळस यायची पण ती मात्र त्याला जवळ घ्यायची. प्रतीक्षाने नवीनच घेतलेल्या फोनमध्ये आम्ही त्या बाळासोबत फोटो काढले होते. मुग्धा लाडाने त्याला बंटी म्हणायची, नेहमी पर्समध्ये चॉकलेट ठेवायची त्याच्यासाठी, बंटीच्या हातावर छोटासा ओम गोंधलेला होता.

गोऱ्या गोमट्या हातावर तो उठून दिसायचा, ते जोडप दगडाच्या मूर्त्या, पाटे, वरवंटे बनवायचे आणि ते रस्त्याच्या कडेलाच बसून विकायचे .

आम्ही कॉलेजमध्ये असताना छान एन्जॉय करायचो, एकमेकींच्या घरी जाऊन गप्पा किंवा भेळपार्टी, कधी तरी सिनेमा बघायला टॉकीज मध्ये जायचो, लेक्चर बुडवून कधी कधी डोंगरावर फिरायला जायचो.

तशी मुग्धा नव्हती ती जास्त मिसळत नव्हती आमच्यात. खूप हुशार होती असे नाही जेमतेमच पण राहणी अगदी साधी लांबसडक केस त्यांची घट्ट वेणी त्याला एखादे मोगऱ्याचे फूल, पंजाबी ड्रेस, चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य, खूप प्रेमळ कधी कोणाला दुखवत नव्हती.

साधारण कुटुंबातली साधी मुलगी होती. आमचा व्हाट्सअपवर बऱ्याच दिवसांपासून ग्रुप होता पण मुग्धाचा नंबर नव्हता. या कविताला कसा मिळाला माहीत नाही, हेच विचारावं म्हणून कविताकडे मी जरा पुढे होवुन बघितल तर ती मंगलच्या खांद्यावर डोक ठेवुन अक्षरशः झोपली होती.

या दोघी मोबाईलमध्ये गुंग होत्या, मोबाईल पर्समध्ये टाकत सुजाता मंगलला बोलली “अग तिला उठव आता, मनमाड आले जवळ उतरावे लागेल आपल्याला.

त्या आवाजाने कविताही उठली आम्ही बॅगा काढल्या, पर्स खांद्यावर सरसावत उतरायची तयारी करू लागलो. तेवढ्यात बस थांबली आम्ही उतरलो आणि सरळ स्टेशनकडे जायला निघालो.

दिवसभर मुंबई फिरून रात्री मंगलच्या बहिणीकडे मुक्कामाला जायचे होते आणि दुसर्‍या दिवशी पुन्हा घरी, तरीसुद्धा या पोरींनी इतक्या मोठ्या बॅगा का घेतल्या असतील हा विचार करून मनातल्यामनात हसू येत होतं.

स्टेशन पर पोहोचलो आणि मुग्धाची आठवण आली “मुग्धा का आली नाही अजून” मी सुजाताला विचारले “अगं ती तर केव्हाच निघाली घरून” असे म्हणत आम्ही घाईघाईने दादरच्या पायऱ्या उतरत होतो.

“अगं ती बघ आपल्याला शोधतेय” असे म्हणत मंगलने मुग्धाकडे हात करत तिला आवाज दिला, आम्ही मुग्धा जवळ पोहोचलो होतो तेवढ्यात रेल्वे पण येऊन थांबली. मुग्धाला स्टेशनवर पोचवायला तिचे मिस्टर आणि तिचा मुलगा दोघेही आले होते.

पुढे होऊन तिने सगळ्यांची ओळख करून दिली, तिचे मिस्टर बस डेपोत नोकरीला होते. मुग्धा पण घरीच मुलांचे क्लास घेऊन थोडेफार पैसे मिळवत होती, परिस्थिती जेमतेम असलेल हे कुटुंब पण खूप आनंदात आणि सुखात दिसत होत.

सर्व रेल्वेत चढायला लागलो, सुजाता पुढे घेऊन सर्वांचे सीट नंबर शोधत होती, मुग्धा मुलाच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवत “पप्पांना त्रास देऊ नको वेळेवर जेवण कर” अशा सूचना त्याला देत ती ही माझ्या मागे निघाली.

सुजाताने सीटकडे हात करत सांगितले “तुम्ही दोघी तिथे बसा” पण माझं तिच्याकडे लक्षच नव्हतं मी सारखी मागे वळून मुग्धाच्या मुलाकडे बघत होते. त्यांच्या लग्नाला पाच वर्ष झाली आणि हा मुलगा तर सहा-सात वर्षांचा दिसतोय मी गोंधळून गेले होते.

मला काहीच सुचत नव्हत, मुग्धा आणि मी शेजारी शेजारी बसलो, मुग्धा पर्स चाचपु लागली ती काहीतरी शोधत होती मग तिच्या लक्षात आलं, तिचा मोबाईल तिच्या मुलाकडेच राहिला.

तिने खिडकीतून त्याला आवाज दिला “बंटी माझा मोबाईल तुझ्याकडेच आहे दे ना लवकर” तिच्या तोंडून बंटी हा शब्द ऐकताच मी चिनभिन झाले.

बंटीने मोबाईल देण्यासाठी खिडकीतून हात पुढे केला आणि त्याच्या गोऱ्या मनगटावर ओमकारच गोंधन बघून मला धक्काच बसला. माझ्या पायाखालची जमीनच सरकली, माझ्या डोक्यात प्रश्नांचं काहूर उठलं, ही घटना आमच्या डोळ्यासमोर घडली त्या घटनेला आम्ही तिथेच विसरलो होतो पण मुग्धाने त्या मुलाला आपल्या आयुष्याचा एक भाग बनवला होता पण का?

आणि तिचे मिस्टरांनी तरी कसे काही त्या मुलाला स्वीकारले? एक मुलगी जिने नव्या संसाराची स्वप्न बघायचे अशावेळी तिने इतकी मोठी जबाबदारी कशी काय पेलली, ना जातीचा ना पातीचा अशा कोणावरी आपल मातृत्व कसं कोणी बहाल करू शकत ,मी साशंक नजरेने तिच्याकडे पाहत होते.

ती नेहमीसारखीच, स्मित हास्य करत होती जसे काही घडलेच नाही, आणि आम्ही सर्व त्या घटनेपासून अनभिज्ञ होतो, माया ममतेची प्रत्यक्ष मूर्ती माझ्यासमोर उभी होती, कितीतरी वेळ मी फक्त माझ्या कृतज्ञतापूर्ण नजरेने तिचे औक्षण करत होते…..

– लेखिका प्रतिभा सुरेश खैरनार या नांदगाव तालुक्यातील आहेत

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *