Wednesday, April 24, 2024
Homeनगरघर नावावर करण्यासाठी आईला मारहाण

घर नावावर करण्यासाठी आईला मारहाण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

घर नावावर कर असे म्हणत बेलापूर येथील एका वृध्देस मुलाने व सुनेने शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच घरातील कपाट उघडून आपले 5 तोळ्याचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने कपाटातून काढून घेतले. याप्रकरणी मुलगा व सुनेविरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावात राहणार्‍या कौशल्याबाई रामदास कदम (वय 74) या वृध्द महिलेचा मुलगा सतीश रामदास कदम (वय 58) व सून अलका सतीश कदम (वय 55) हे श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे राहत असून ते दोघेही बेलापूर येथे आईकडे येवून वारंवार घर विकून आम्हाला पैसे दे असे म्हणत पैशांची मागणी करत असत. तसेच घर आमच्या नावावर करून दे, अशी मागणी करण्यासाठी मुलगा आणि सून बेलापूरला आले व त्यांनी तू आता मरायला आली आहे, तू मरायच्या अगोदर हे घर आमच्या नावावर करून दे, असे म्हणत घाणघाण शिवीगाळ केली तसेच सून अंगावर धावून आली आणि केस धरून जोरात ओढून शिवीगाळ केली. याचवेळी घरातील कपाट उघडून आपले 5 तोळ्याचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने कपाटातून काढून घेतले व तू म्हातारी झाली आहे, हे दागिने तुझ्या कामाचे नाही, असे म्हणत आपणास दमदाटी, शिवीगाळ करत दोघेही निघून गेले.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसात फिर्याद द्यायला गेली असता पोलिसांनी तक्रार न नोंदविल्याने सदर वृध्द महिलेने पोलीस अधीक्षकांनाही पत्र पाठवले. त्यानंतर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे सदर महिलेने कोर्टात फिर्याद दिली. त्याची दखल घेवून कोर्टाने सीआरपीसी 156, 3 प्रमाणे श्रीरामपूर शहर पोलिसांना सदर प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास करण्याचे आदेश दिले.

सदर महिलेच्या फिर्यादीवरून सतीश रामदास कदम व अलका सतीश कदम यांच्याविरोधात श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात भादंवि कलम 323, 324, 34, 392, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या