Wednesday, April 24, 2024
Homeनगरमोरवाडीला बिबट्याच्या हल्ल्यात रेसर घोडा ठार

मोरवाडीला बिबट्याच्या हल्ल्यात रेसर घोडा ठार

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

जयमंगलने शर्यतीचे मैदान गाजवले! पण बिबट्याच्या हल्ल्यात मात्र तो गतप्राण झाला. अस्तगावच्या मोरवाडीतील त्रिभुवन कुटुंबियात लाडका अश्व बिबट्याने हल्ला करून त्याचे अस्तित्व संपविले.

- Advertisement -

मोरवाडी येथील नितीन आंद्रेस त्रिभुवन यांचा 5 ते साडेपाच वर्षाचा जयमंगल नावाचा घोडा शर्यतीत त्रिभुवन यांची मान उंचावणारा होता. असा हा गुणी अश्व काल संध्याकाळी बिबट्याच्या भक्ष्यस्थानी सापडला. त्रिभुवन यांची मोरवाडीजवळ वस्ती आहे. त्यांची सर्व जनावरे गोठ्यात बांधलेली होती. काल बुधवारी पहाटे 4 च्या सुमारास गोठ्यात इतर गायींच्या समवेत बांधलेल्या घोड्यावर बिबट्याने हल्ला केला. घोड्याची मान उंच असल्याने बिबट्याने पंजाने त्या घोड्याची मान खाली करून नरडीचा घोट घेतला. या दोघांतील झटापटीचा आवाज त्रिभुवन कुटुंबियांना एव्हाना आला होता. त्यांनी घरातून बाहेर येऊन हे दृश्य पाहिले. त्यांनी बिबट्याला घाबरविण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने बिबट्याने घोड्याला सोडून शेजारील उसात धूम ठोकली.

मात्र नरडीचे लचके तोडल्याने घोड्याने जीव सोडला. घोड्याचा मागील पाय कुणाला लाथ मारू नये म्हणून बांधलेला होता. त्याचा फायदा बिबट्याने घेतला. दरम्यान काल दिवसभरात वनविभागाचे साखरे, पशुवैद्यक डॉ. भालेराव, डॉ. उमेश पंडूरे यांनी घटनास्थळी भेट दिली व पंचनामा केला.

काल सायंकाळी 7 वाजता हा बिबट्या एका उसातून दुसर्‍या उसात जाताना काहींनी पाहिला. मोरवाडी परिसरात बिबट्याचा मुक्काम वाढला आहे. दरम्यान अस्तगाव परिसरात बिबट्याची मोठी दहशत आहे. या बिबट्यांना जेरबंद करण्यात यावे, अशी मागणी ग्रामपंचायतीचे सदस्य राजेंद्र पठारे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या