Thursday, April 25, 2024
Homeनगरमोरया प्रतिष्ठानच्या अध्यक्षाविरूध्द गुन्हा

मोरया प्रतिष्ठानच्या अध्यक्षाविरूध्द गुन्हा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नवरात्र उत्सवादरम्यान गुलमोहर रोडवरील मोरया युवा प्रतिष्ठान मंडळाचा दांडिया कार्यक्रम सुरू असताना विजेच्या धक्क्याने रोहित धनंजय जगधने (वय 13) या मुलाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मोरया युवा प्रतिष्ठानचा अध्यक्ष अर्जुन मनोज मदान याच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मयत रोहितची आई अनिषा धनंजय जगधने (वय 38 रा. गुलमोहर रोड, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. 29 सप्टेंबर रोजी रात्री फिर्यादी यांचा मुलगा रोहित व मुलगी रेणूका हे दोघे मोरया युवा प्रतिष्ठानच्या नवरात्र उत्सव कार्यक्रमासाठी गेले होते. तेथे ते दांडिया खेळत असताना मंडळाने डीपीमधून घेतलेल्या लाईटच्या केबलजवळील लोखंडी खांबाला करंट लागून रोहित खाली कोसळला. त्याला उपचारासाठी सुरूवातीला खासगी रुग्णालयात व नंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. याप्रकरणी 16 ऑक्टोबर रोजी मयत रोहितची आई अनिषा जगधने यांनी तोफखाना पोलिसांत फिर्याद दिली आहे.

दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,‘गुलमोहर रोडवरील आनंद शाळेसमोरील अर्जुन मनोज मदान यांचे मोरया युवा प्रतिष्ठान येथे मंडळाने नवरात्र दरम्यान डीपीतून अनधिकृत विजेचे कनेक्शन घेऊन त्याची केबल वायर हयगयीने व निष्काळजीपणाने उघड्यावर ठेवल्याने त्या वायरने माझा मुलगा रोहित धनंजय जगधने यास धक्का लागल्याने तो मयत झाला आहे. म्हणून माझी मोरया युवा प्रतिष्ठान मंडळाचे अध्यक्ष अर्जुन मनोज मदान याच्याविरूध्द फिर्याद आहे. अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या