महिनाअखेर शाळा सिध्दी स्वयंमूल्यमापन पूर्ण करण्याचे आदेश

jalgaon-digital
3 Min Read

संगमनेर |वार्ताहर| Sangmner

राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची शाळा सिध्दी मूल्यांकन प्रक्रिया अंतर्गत

स्वयंमूल्यांकनाची प्रक्रिया 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांनी दिले आहेत.

केंद्र सरकारच्यावतीने देशभरातील प्राथमिक ते उच्च माध्यमिक अशा सर्व स्तरावरील 100% शाळांना स्वयं मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. दरवर्षी ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येत असली तरी यावर्षी करोनामुळे स्वयंमूल्यमापनाची प्रक्रिया पूर्णत्वाला जाऊ शकली नाही.

ही बाब लक्षात घेऊन राज्यातील शंभर टक्के शाळांनी स्वयंमूल्यमापनाची प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. केंद्र सरकारच्या मिपा या संस्थेच्या वेब पोर्टलवर ही माहिती ऑनलाईन स्वरूपात भरावयाची आहे. या वेब पोर्टलवरती सर्व स्वरुपाची आवश्यक ती माहिती व मार्गदर्शन पुस्तिका उपलब्ध करून देण्यात आलेली आहे .त्यामुळे दीपावली नंतर राज्यातील सुमारे 1 लाख शाळांना ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

तालुका व जिल्ह्याला नोडल ऑफिसर

शाळा सिध्दी मूल्यांकनाची प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने जिल्हा व तालुका स्तरावर ती स्वतंत्र जबाबदारी देऊन या प्रक्रियेला गती देण्याचा प्रयत्न होणार आहे. यासंदर्भात जिल्हा व तालुका स्तरावर नोडल अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.संबंधित नोडल अधिकारी यांच्या द्वारे वरिष्ठ कार्यालय सातत्याने आढावा घेणार आहेत. त्यामुळे या कामाची गती वाढविणे आवश्यक ठरणार आहे.

राज्यातील 93 हजार शाळांचे स्वयंमूल्यमापन पूर्ण

शाळा सिध्दी अंतर्गत प्रत्येक वर्षी शाळांना स्वयंमूल्यमापनाची प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहेत. राज्यात एकूण एक लाख सहा हजार 900 प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा अस्तित्वात आहेत. त्यापैकी 93 हजार 105 शाळांनी ही प्रक्रिया अद्यापपर्यंत पूर्ण केलेली आहे ,तर पाच हजार 582 शाळांनी माहिती भरण्यास प्रारंभ केला आहे. तथापी 8 हजार 213 शाळांनी अद्याप माहिती भरलेली नाही. राज्यात अद्याप एकाही शाळेचे बाह्य मूल्यमापन पूर्ण करण्यात आलेले नाही.

अहमदनगर मध्ये साडेचार हजार शाळांची माहिती पूर्ण

विद्या प्राधिकरणाने शाळा सिध्दी स्वयंमूल्यमापन ची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिलेले असले, तरी या शैक्षणिक वर्षात अहमदनगर जिल्ह्यातील पाच हजार 276 शाळांपैकी 4450 शाळांनी आपले स्वयंमूल्यमापन पूर्ण केले आहे.376 शाळा या माहिती प्रक्रियेत कार्यरत असून 487 शाळांनी अद्याप माहिती भरण्यास सुरुवात केलेली नाही.

नाशिक जिल्ह्यातील पाच हजार 664 शाळांपैकी चार हजार 977, नंदुरबार 2027 शाळांपैकी 1797,जळगाव 3312 पैकी 2994 शाळांनी माहिती पूर्ण केली आहे. धुळे जिल्ह्यातील 1977 शाळांपैकी 1445 शाळांनी आपली माहिती पूर्ण केली आहे. राज्यात एकूण 8313 शाळांनी अद्याप माहिती भरलेली नाही.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *