Friday, April 26, 2024
Homeनगरमनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी अभिनेत्रीची साईदरबारी हजेरी!

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी अभिनेत्रीची साईदरबारी हजेरी!

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी व ईडीकडून चौकशी सुरू असलेल्या एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीने नुकतीच साईदरबारी हजेरी लावली. मात्र या अभिनेत्रीच्या शिर्डी भेटीचे साईसंस्थानातील सीसीटीव्ही फुटेज व फोटो डिलीट करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याची संस्थान परिसरात कुजबूज सुरू आहे.

- Advertisement -

बॉलिवुड मधील आघाडीची अभिनेत्री अशी ओळख असलेल्या एक सुप्रसिद्ध अभिनेत्री सध्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी म्हणून देशभर चर्चा सुरू आहे. ईडी सुद्धा या अभिनेत्रीची वारंवार चौकशी करत आहे. या अभिनेत्रीने आपल्यावरील संकट दूर होवो म्हणून नुकतीच साईदरबारी हजेरी लावली. शिर्डी भेटीत एका विश्वस्ताच्या स्वीय सहाय्यकाकडून या अभिनेत्रीला व्हीव्हीआयपी ट्रिटमेंट देऊन आदरतिथ्य करण्यात आले. मात्र या अभिनेत्रीची पार्श्वभूमी समजताच संस्थानातील या संबंधातील सीसीटीव्ही फुटेज व फोटो डिलीट मारण्याचा प्रयत्न झाल्याचे कळते.

मुळातच या अभिनेत्रीने साईदरबारी येऊन बाबांना साकडे घालण्यात काहीही गैर नाही. ती मनी लॉन्डिंगमधील आरोपी असल्याने व आपण व्हीआयपी ट्रिटमेंट दिल्याने आपण अडचणीत किंवा चर्चेत येऊ शकतो या शक्यतेने संबधितांनी थेट सीसीटीव्हीच्या नियंत्रण कक्षात जाऊन परस्पर हा बेकायदेशीर उद्योग करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. साईदरबारी भेट देणारी ही अभिनेत्री कोण व तीचे आदरतिथ्य करून संस्थानातील फुटेज बेकायदेशीररित्या डिलीट करणारा तो स्विय सहाय्यक कोण, तो खासगी आहे की संस्थानचा, याबाबत स्पष्टता नसली तरी संस्थान परिसरात याबाबत वेगवेगळे तर्क लावण्यात येत आहेत.

संस्थान प्रशासनाने मात्र या प्रकरणात मौन धारण केले आहे. संस्थानच्या सीईओ भाग्यश्री बानायत यांनी या प्रकाराबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आहे. देशातील दुसर्‍या व राज्यातील प्रथम क्रमांकाचे देवस्थान म्हणून साईसंस्थानची ख्याती आहे. यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने अतीसंवेदनशील असलेल्या देवस्थानात सीसीटीव्ही रेकॉर्ड मध्ये छेडछाड करणे, डिलीट करणे गंभीर बाब आहे. यापुर्वी मंदिरातील फुटेज बेकायदेशीरपणे बाहेर दिल्याप्रकरणी एक वरिष्ठ अधिकारी व काही कर्मचारी निलंबीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या