Wednesday, April 24, 2024
Homeनगर‘मोक्का’ गुन्ह्यातील दोन सराईत अटकेत

‘मोक्का’ गुन्ह्यातील दोन सराईत अटकेत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मोक्का गुन्ह्यात पसार असणार्‍या दोन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले. किशोर उर्फ ईश्वर दिलीप शिंदे (वय 24 रा. देहरे ता. नगर) व महेश मनाजी उर्फ मनोहर शिंदे (वय 28 रा. विळद ता. नगर) अशी जेरबंद केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.

- Advertisement -

एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत शस्त्राचा धाक दाखवून दरोडा टाकल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यात दरोडा, आर्म अ‍ॅक्ट आदी कलमान्वये गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा सराईत गुन्हेगारांच्या टोळीने केल्याचे उघडकीस आल्यानंतर टोळीविरोधात मोक्का लावण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी किशोर उर्फ ईश्वर दिलीप शिंदे व महेश मनाजी उर्फ मनोहर शिंदे हे दोघे पसार होते. त्यांना न्यायालयाने पूर्वी मंजूर केलेला जामीनही रद्द केला होता.

जामीन रद्द झाल्यानंतरही ते पसारच होते. एमआयडीसी पोलीस त्यांच्या शोधात असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांना माहिती मिळाली की, सदरचे सराईत गुन्हेगार देहरे शिवारात आले आहेत. त्यांनी तत्काळ आपल्या पथकासह देहरे शिवारात सापळा रचून आरोपींना शिताफीने ताब्यात घेत गुन्ह्यात अटक केली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक आठरे, पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर, पोलीस अंमलदार साबीर शेख, सुरज देशमुख, जयसिंग शिंदे, किशोर जाधव, प्रशांत राठोड, नितीन शिंदे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

तीन पोलीस ठाण्यात 10 गुन्हे

एमआयडीसी पोलिसांनी मोक्का गुन्ह्यात अटक केलेले किशोर ऊर्फ ईश्वर दिलीप शिंदे (वय 24 रा. देहरे ता. नगर) व महेश मनाजी उर्फ मनोहर शिंदे (वय 28 रा. विळद ता. नगर) हे दोघे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरूध्द एमआयडीसी, नगर तालुका, दौंड (जि. पुणे) पोलीस ठाण्यात दरोडा, जबरी चोरी, आर्म अ‍ॅक्ट, घरफोडी आदी कलमान्वये 10 गुन्हे दाखल आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या