Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रMLC Election 2020 : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी सुरू

MLC Election 2020 : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी सुरू

मुंबई | Mumbai

विधान परिषदेच्या सहा जागांसाठी १ डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. तीन पदवीधर, दोन शिक्षक व एका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ही निवडणूक झाली होती. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी आणि भाजप या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदा समोरासमोर लढले.

- Advertisement -

राज्यात पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासह, नागपूर पदवीधर, औरंगाबाद पदवीधर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघात निवडणूक पार पडली. या निवडणुकीची मतमोजणी सकाळी आठ वाजेपासून सुरु होणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या या निवडणुकीचा अंतिम निकाल यायला वेळ लागण्याची शक्यता आहे.

पुणे पदवीधरमध्ये भाजपकडून संग्रामसिंह देशमुख आणि राष्ट्रवादीचे अरुण लाड आणि अपक्ष श्रीमंत कोकाटे यांच्यात प्रमुख लढत झाली. या ठिकाणी मनसेच्या रुपाली पाटील देखील मैदानात आहेत. तर औरंगाबाद पदवीधरमध्ये राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आणि भाजपचे शिरीष बोराळकर यांच्यात लढत झाली. नागपूर पदवीधरमध्ये भाजपचे संदीप जोशी आणि काँग्रेसचे अभिजित वंजारी यांच्यात थेट लढत झाली.

पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे जयंत आसगावकर आणि भाजपचे जितेंद्र पवार आणि अपक्ष म्हणून मैदानात असलेले दत्तात्रय सावंत यांच्यात प्रमुख लढत झाली. तर अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे श्रीकांत देशपांडे आणि भाजपचे नितीन धांडे यांच्यात लढत झाली.

महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेमध्ये एकूण 78 सदस्य आहेत. यामध्ये 31 सदस्य विधानसभेतील आमदार निवडून देतात. 21 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडले जातात. तर 12 जणांची नेमणूक राज्यपालांकडून होते. उर्वरित 7 उमेदवार शिक्षक मतदारसंघातून तर 7 पदवीधर मतदारसंघातून निवडून येतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या