Tuesday, April 23, 2024
Homeनगरआमदारांचे वेतन व निवृत्ती वेतनाबाबत सोशल मीडियावर नेटकर्‍यांकडून रणकंदन

आमदारांचे वेतन व निवृत्ती वेतनाबाबत सोशल मीडियावर नेटकर्‍यांकडून रणकंदन

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

राज्याचा कारभार पाहणारे आमदार यांचे वेतन व माजी आमदारांचे निवृत्तीवेतन याबाबत सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. कोविडमुळे राज्य संकटात असताना विद्यमान आमदारांचे लाखोंचे पगार व माजी आमदारांचे हजारोंचे निवृत्तीवेतन नेटकर्‍यांच्या टीकेचा विषय होत आहे.

- Advertisement -

करोनामुळे उत्पन्न कमी झाल्याने राज्याने अनेक समाजोपयोगी योजनांना कात्री लावली. विकास कामांमध्येही हात आखडता घेतला. तिजोरीतील घटलेले उत्पन्न वाढविण्यासाठी पेट्रोल डिझेलवर अतिरिक्त कर लावून सर्वसामान्यांच्या खिशातले पैसे काढून घेतले. मात्र जनतेकडून कर रूपाने जमा होत असलेला पैसा शासनातील कारभार्‍यांकडून आजी माजी आमदारांच्या पगारावर, निवृत्ती वेतनावर मोठ्या प्रमाणावर खर्च होत असल्याची खरपूस चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

यामध्ये प्रत्येक विद्यमान आमदारांवर महिन्याकाठी मूळ वेतन, प्रवास भत्ता, संगणक प्रचालक खर्च, टेलीफोन खर्च, टपाल खर्च यासाठी दोन लाखांचा खर्च केला जात असून याच आमदारांची पाच वर्षांची टर्म संपल्यावर त्यांना पन्नास हजारांपासून ते लाखापर्यंत निवृत्ती वेतन दिले जात असल्याची आकडेवारी झळकत आहे.

नेटकर्‍यांच्या मते सर्वसामान्य नागरिक 15-20 हजार महिना वेतनावर काबाडकष्ट करतो. आपले कुटुंब, मुला-बाळाचे शिक्षण आदी बाबी काटकसरीतून करतो. आयुष्यभर नोकरी केल्यावर निवृत्त झाल्यावर त्याला निवृत्ती वेतनही मिळत नाही. त्याची पेन्शन योजनाही शासनाने बंद केली आहे. मात्र केवळ पाच वर्षे आमदार राहिल्यावर या आमदारांना लाखांपर्यत निवृत्तीवेतन सुरू होते. एकीकडे तिजोरीत खडखडाट असल्याची ओरड होते तर दुसरीकडे आमदारांच्या पगारावर होणार्‍या हजारो कोटींच्या खर्चावर कोणीही बोलत नसल्याचे चित्र आहे. उलट दरवर्षी यात वाढ होताना दिसत आहे.सोशल मीडियावर नेटकर्‍यांमधून याबाबत अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

सर्वसामान्य नागरिक उपाशी तर नेते तुपाशी

सोशल मीडियावर सध्या पन्नास हजार ते लाखापर्यतचे दरमहा निवृत्ती वेतन घेणार्‍या 668 विधानसभेच्या व 143 विधान परीषदेच्या माजी आमदारांची आकडेवारीसह यादी मोठ्या प्रमाणात फिरत आहे. तसेच लोकांचे सेवक म्हणविणार्‍या विद्यमान आमदारांवर सरकार दरमहा किती खर्च करते याची आकडेवारी फिरत आहे. करोना संकटामुळे अनेकांच्या नोकर्‍या गेल्या, बेरोजगारी वाढली, भाववाढ झाली, शेतकर्‍यांचे अनेक प्रश्न तयार झाले, एस. टी. चा संप मिटेना, प्रवाशांचे हाल होत आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांची मालिकाच तयार झाली आहे. मात्र लोकांची सेवा करण्याच्या नावाखाली हे पुढारी स्वतःच कसा मेवा खात आहेत याबाबतच्या संतप्त पोस्ट नेटकर्‍यांमधून व्हायरल होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या