कर्जत-जामखेडचा विकास केवळ कागदावरच

jalgaon-digital
2 Min Read

आमदार रोहित पवार यांचा माजी मंत्री राम शिंदे यांना टोला

अहमदनगर (प्रतिनिधी) – गेल्या 30 वर्षांपासून कर्जत-जामखेड मतदारसंघाचा विकास झालाच नाही. एकाही विभागाचे काम पूर्णत्वाला गेले नाही. तो विकास फक्त कागदावर, छापलेल्या पुस्तकातच दिसत आहे, असा टोला आमदार रोहित पवार यांनी आज माजी मंत्री राम शिंदे यांना लगावला. 30 वर्षाचा अनुशेष भरून कर्जत-जामखेडला प्रशासन व विविध संघटनांच्या माध्यमातून विकसित करण्याचा निर्धार केला आहे. महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नसून लोकहिताचे काम करण्यास आमचे प्राधान्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रशासकीय बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील व इतर अधिकारी उपस्थित होते. पवार म्हणाले, आगामी काळामध्ये आम्ही कर्जत-जामखेडचा विकास करून दाखवणारच. त्यासाठी पावले सुद्धा उचलली असून राजस्व अभियानाच्या माध्यमातून राज्य सरकार व प्रशासन यांची सांगड घालून मॉडेल मतदारसंघ करणार आहोत. तुम्ही मंत्री होतात, तुमच्याकडे मोठे खाते होते, त्याचा वापर मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी करता आला नाही, असा आरोपही पवार यांनी राम शिंदे यांच्यावर केला.

ते म्हणाले, मतदारसंघांतील रस्त्याची कामे निकृष्ट दर्जाची आहेत. पाण्याचा प्रश्न सुटू शकला नाही. पाण्यासाठी राजकारण करण्यात आले. कुकडीचे पाणी आता वेळेमध्ये आणण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांबरोबर बैठक घेतली असून हक्काचे पाणी निश्चित दिले जाईल.

एमआयडीसीसाठी सर्वेक्षण करण्याबाबत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासमवेत बैठक झाली. तूकाई चारीचा प्रश्न आम्ही निश्चितपणे मार्गी लावणार असून, त्या संदर्भात अधिकार्‍यांची बैठक झाली आहे. कुकडीच्या संदर्भामध्ये आता पुण्याचे व आपले असे राष्ट्रवादीचे एकूण सात आमदार आहेत. यासाठी आमदार बबनराव पाचपुते सुद्धा मदत करतील, असा विश्वास आमदार पवार यांनी व्यक्त केला.

झेडपीतही महाविकास आघाडी
महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्याला राजकारणाची वेगळी दिशा मिळाली. तसेच लोकांच्या हितासाठी जिल्ह्यात असेच समीकरण तयार व्हावे, अशी माझी अपेक्षा आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट करतानाच महाविकास आघाडीला एकत्र बांधण्याचे सूतोवाच त्यांनी केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *