Friday, April 26, 2024
Homeनगरकेंद्राने महाराष्ट्राचा खिसा कापला; रोहित पवारांचा आरोप

केंद्राने महाराष्ट्राचा खिसा कापला; रोहित पवारांचा आरोप

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरानुसार आज पेट्रोलचा दर 81 रुपयांपेक्षाही कमी असायला हवा, परंतु आपल्याला 105 रूपये लिटर म्हणजेच लिटरमागे 24 रुपये जादा मोजावे लागतात. याची सर्वाधिक झळ महाराष्ट्रातील जनतेला बसते, असा आरोप राष्ट्रवादीचे आ.रोहित पवार यांनी केला आहे. केवळ 5 महिन्यात केंद्राने राज्यातील जनतेच्या खिशातून 8 हजार कोटींची लूट केल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

यापूर्वी पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यास आ.पवारांनी ठाम विरोध दर्शविला होता. तर आता पेट्रोल-डिझेलबाबत योग्य धोरण राबवलं नाही तर त्याचा सामान्य माणसाला कसा फटका बसतो? यावर ट्विट करत रोहित पवारांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. आ.पवार म्हणतात, पेट्रोल-डिझेलबाबत योग्य धोरण राबवलं नाही, तर त्याचा सामान्य माणसाला कसा फटका बसतो, हे सध्या बघायला मिळतंय.

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरानुसार आज पेट्रोलचा दर 81 रुपयांपेक्षाही कमी असायला हवा, परंतु आपल्याला 105 रु लिटर म्हणजेच लिटरमागे 24 रुपये जादा द्यावे लागतात. याची सर्वाधिक झळ बसते महाराष्ट्रातील जनतेला. कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी झाल्या असतानाही केंद्राने पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले नसल्याने महाराष्ट्राच्या जनतेला ऑगस्ट ते नोव्हेंबर या चार महिन्यात पेट्रोल-डिझेलसाठी 6096 कोटी रूपये जास्त मोजावे लागले.

आताही दर कमी केले नाही तर केवळ डिसेंबरमध्ये महाराष्ट्रातील सामान्य जनतेला 2519 कोटी रूपये जास्त मोजावे लागतील. म्हणजेच 5 महिन्यात केवळ महाराष्ट्रातून 8000 कोटींपेक्षाही जास्त लूट करण्यात आली आहे. तरीही महाराष्ट्राला ना प्रकल्प मिळत, ना सीमाप्रश्न सुटण्यास मदत होते, ना नैसर्गिक संकटात मदत मिळते!, असे त्यांनी ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या