हिंदूवरील अत्याचार थांबले नाहीतर जशास तसे उत्तर

jalgaon-digital
4 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिहादी प्रवृत्तीच्या लोकांकडून नगरमध्ये हिंदूंना, हिंदू व्यापार्‍यांना टार्गेट केले जात आहे. अधिकारीही त्याला खतपाणी घालत आहेत. हिंदूंवरील हे अत्याचार थांबले नाहीत तर जशास तसे उत्तर दिले जाईल, जिहादींची मस्ती आम्हाला उतरवता येते हे लक्षात ठेवा, असा इशारा भाजप आ.नितेश राणे यांनी मंगळवारी नगरमध्ये दिला.

नगर शहरात गेल्या काही दिवसांपासून तणाव निर्माण करणार्‍या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आ. राणे मंगळवारी नगरमध्ये आले होते. त्यांनी तणाव निर्माण करणार्‍या घटनास्थळी तसेच त्यामध्ये जखमी झालेल्यांची निवासस्थानी व रुग्णालयात जाऊन भेट घेतली. कापडबाजारात चौकसभाही घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अधिकार्‍यांशी चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आपला हा दौरा राजकीय नाही तर हिंदू तरुणांना ताकद देण्यासाठी, धीर देण्यासाठी आहे. नगरचे पोलीस व महापालिका आयुक्त जिहादी विचाराला खतपाणी घालत आहेत.

अतिक्रमण हटाव मोहीम नौटंकी ठरत आहे. गाडी पुढे गेली की पाठीमागे पुन्हा अतिक्रमणे होतात. व्यापार्‍यांच्या दुकानापुढे अतिक्रमण करणार्‍यांच्या टपर्‍यामध्ये हत्यारे आहेत, त्याचीही माहिती पोलिसांना दिली आहे. हिंदू व्यापार्‍यांवर हल्ला होऊनही, पोलीस परस्परविरोधी गुन्हे दाखल करतात. हे चुकीचे घडत आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री व पालकमंत्र्यांना माहिती देणार आहे, असेही आ. राणे म्हणाले. केवळ नगरच नव्हे तर हिंदूंवर राज्यात जेथेजेथे अन्याय होतो तेथेतेथे आपण जातो.

विधीमंडळाचा सदस्य म्हणून राज्याचे प्रश्न मांडणे हे आमचे काम आहे. सरकारला एखाद्या गोष्टीची माहिती मिळत नसेल तर ती माहिती पुरवणे हे माझे काम आहे. त्यामुळे आपण नगरमध्ये येऊन माहिती घेतो. विधिमंडळात प्रश्न उपस्थित केल्यानंतर परिस्थिती बदलते. यापूर्वी नगरमधील धर्मांतराचा विषय उपस्थित केल्यानंतर कारवाई झाली. जिहादींना अटक झाली, असेही त्यांनी सांगितले.

आ. जगताप यांना अप्रत्यक्ष इशारा ?

नगर शहरातील हिंदूंवरील अत्याचाराला स्थानिक आमदार जबाबदार आहेत, ते जिहादींच्या कारवायांना खतपाणी घालतात. हिंदूंनी त्यांचे काय दुखावले आहे? त्यांना मतदान करणारे हिंदूच आहेत, हे त्यांनी विसरू नये, असा इशारा भाजप आमदार राणे यांनी राष्ट्रवादी आ. संग्राम जगताप यांचे नाव घेऊन दिला.

मनपा आयुक्तांवर आक्षेप

आ. राणे यांनी महापालिका आयुक्तांच्या कारभारावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अतिक्रमणासंदर्भात व्यापार्‍यांनी अनेक निवेदने देऊनही केवळ नामधारी मोहीम राबवली जाते. त्यामुळे प्रश्न सुटणार नाही. सध्याचा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न त्यातूनच निर्माण झाला आहे. राज्य सरकारकडे आयुक्तांच्या बदलीची व त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करू. आयुक्त हे स्थानिक आमदारांच्या दबावाखाली काम करतात. यापुढे हिंदूंवरील अन्याय सहन केला जाणार नाही, असाही इशारा आ. राणे यांनी दिला.

अधिकार्‍यांविरोधात शिवराळ भाषेचा वापर

कापडबाजारातील सभेत बोलताना आ. राणे यांनी मनपा आयुक्त व पोलिसांचा अतिशय शिवराळ भाषेत उल्लेख केला. यापूर्वी आपण नगरमध्ये आलो होतो, परंतु परिस्थिती सुधारली नाही. आणखी वाईट होत चालली आहे. जिहादींची हिंमत वाढते आहे, परंतु आता सरकार बदलले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहिले नाहीत आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ राहिले नाहीत हे अधिकार्‍यांनी लक्षात ठेवावे. कोण अधिकारी त्यांना वाचवतात, त्यांच्यासाठी मस्ती करतात, त्यांच्या ड्युट्या कोण वाचवतो, हे मी पाहतो. मी पूर्ण तयारीनिशी आलो आहे. माझ्या वाटेला जाऊ नका, आधी माझी बॅकग्राऊंड तपासा, मग समोर या. व्यापार्‍यांच्या संरक्षणाची जबाबदारी आता आमची आहे. त्यांच्याकडे वाकडे नजरेने बघाल तर डोळे काढल्याशिवाय राहणार नाही. तुमचे इथले आमदारही तुम्हाला वाचवायला येणार का? 2024 जवळच आहे. या आमदारांचा एकदाच कार्यक्रम करून टाका. हिंदूंची ताकद दाखवून द्या, असेही आवाहन आ. राणे यांनी केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *