Friday, April 26, 2024
Homeनगरआ. कानडेंनी स्वीकारले अंजुम शेख यांचे निमंत्रण !

आ. कानडेंनी स्वीकारले अंजुम शेख यांचे निमंत्रण !

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपुरातील राजकीय जुळवा-जुळवींना वेग आला आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीत काय झाले याचा विचार न करता ‘झाले गेले विसरून जावे…’! असा विचार करून प्रत्येकजण निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे गेल्या विधानसभा निवडणुकीत आ. लहू कानडे यांच्या विरोधात प्रचार करणारे ज्येष्ठ नगरसेवक अंजुमभाई शेख यांनी परवा काँग्रेसचे आ. लहू कानडे यांच्या संपर्क कार्यालयात हजेरी लावली. एवढेच नव्हे तर आ. लहू कानडे यांना आपल्या एका कार्यक्रमाचे निमंत्रणही दिले. आ. कानडे यांनीही शेख यांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले.

- Advertisement -

गडाखांवर टांगती तलवार

गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून लहू कानडे तर शिवसेनेकडून माजी आ. भाऊसाहेब कांबळे उमेदवार होते. नगरपालिकेच्या निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून अनुराधा आदिक विराजमान झाल्यानंतर ससाणे यांच्याबरोबर असणारा दहा नगरसेवकांचा काँगेसचा एक गट अंजुम शेख यांच्या नेतृत्वाखाली बाजूला झाला. या गटाने नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांना पाठिंबा दिला. या राजकीय घडामोडींमुळे ससाणे गटाचा अंजुम शेख आणि माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांच्यावर मोठा रोष होता. त्यामुळे त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत स्व. जयंतराव ससाणे यांना धोका दिला म्हणून ससाणे गटाचा भाऊसाहेब कांबळे यांना तीव्र विरोध होता. म्हणून ससाणे गटाने निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार लहू कानडे यांच्या प्रचारात ससाणे संघटना सक्रिय सहभागी झाली. काही झाले तरी भाऊसाहेब कांबळे यांचा पराभव करायचा अशी खूणगाठ बांधललेल्या ससाणे गटाने संपूर्ण ताकद वापरून ही निवडणूक जिंकली. त्यावेळी अंजुम शेख यांनी भाऊसाहेब कांबळे यांच्या बाजूने प्रचार केला म्हणजेच लहू कानडे यांच्या विरोधात अंजुम शेख विधानसभा निवडणुकीत होते.

शिर्डी नगराध्यक्षपदही महिला खुल्या प्रवर्गासाठी

नुकत्याच झालेल्या अशोक कारखान्याच्या निवडणुकीत मुरकुटे-ससाणेंनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यात ससाणे गटाने मुरकुटे यांना कारखान्याच्या निवडणुकीसाठी बिनशर्त पाठिंबा दिला. नव्हे तर ससाणे यांनी मुरकुटे यांचा प्रचारही केला. आगामी नगरपालिका निवडणुकीत ससाणे गटाबरोबर मुरकुटे यांची ताकद असणार आहे. आज लहू कानडे काँग्रेसचे आमदार आहेत. ससाणेही काँग्रेसमध्ये आहेत. दोघेही मंत्री थोरात यांना मानतात. श्रीरामपुरात लहू कानडे आणि ससाणे गट एकत्रित काम करताना दिसतात.

अशावेळी काँग्रेसमध्येच असणारा अंजुम शेख यांचा दुसरा गट इतक्या दिवस आ. लहू कानडे यांच्यापासून दूर होता. परंतु येणार्‍या नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नगरसेवक अंजुम शेख यांनी काँग्रेस पक्षाबरोबरच राहायचे असल्याने परवा श्रीरामपूर शहरातील बेलापूर रोडवरील आ. लहू कानडे यांच्या संपर्क कार्यालयात हजेरी लावून आ. कानडे यांची भेट घेतली.

कर्जतमध्ये महिलाराज तर पारनेरमध्ये आ. लंकेंचे निकटवर्तीय औटींना मिळणार पद

अंजुम शेख यांनी यावेळी आ. कानडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याचेच निमंत्रण देण्यासाठी अंजुम शेख हे आ. कानडे यांच्या कार्यालयात आले होते. विशेष म्हणजे आ. लहू कानडे यांनीही मनाचा मोठेपणा दाखवत अंजुम शेख यांचे निमंत्रण स्वीकारले.अंजुम शेख आणि ससाणे हे दोन्ही गट काँग्रेसमध्ये आहेत. मात्र दोघांचेही एकमेकाबरोबर विळ्याभोपळ्याचे नाते आहे.

गेल्या काही दिवासांपूर्वी माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांनी ससाणे समर्थक काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय छल्लारे यांचे चहापानाचे निमंत्रण स्विकारून शहर काँग्रेसच्या कार्यालयात हजेरी लावली होती. त्यानंतर ससाणे गटापासून दुरावलेला आता अंजुम शेख यांचा गटही आ. कानडे यांच्याजवळ येत आहे. आ. कानडे आणि अंजुम शेख यांच्यातील वाढती जवळीक भविष्यातील पालिकेच्या राजकारणाची नांदी ठरू शकते.

सुरत-हैद्राबाद महामार्गाबाबत शेतकर्‍यांना जास्त मोबदला देण्याचा प्रयत्न

अंजुम शेख यांना या भेटीबाबत विचारले असता, ते म्हणाले, गेली वीस पंचवीस वर्षे मुरकुटे आणि ससाणे यांच्यातील राजकीय संघर्ष श्रीरामपूरकरांनी पाहिला आहे आणि अनुभवलाही आहे. एकमेकांवर अत्यंत जहरी टीका करणारी आणि टोकाचा राजकीय द्वेष करणारी ही मंडळी जर एकत्र येऊ शकते तर आम्ही तर व्यावसायिक मंडळी आहोत. आमचा आणि आ. कानडे यांचा बांधाला बांध नाही. झाले ते निवडणुकीपुरते राजकारण होते. कारण मी पहिल्यापासून काँग्रेसचा होतो, आहे, आणि राहणार आहे. शिवाय आ. कानडे हे काँग्रेसचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून प्रभागात विकासाची कामे करण्याचा तसेच शहराच्या विकासासाठी हातभार लावण्याचा आपला प्रयत्न असल्याने आपण मागचे सगळे विसरून काँग्रेस पक्षाच्या झेंड्याखालीच एकत्र काम करण्यासाठी जवळ आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या