आ. विखे व खा. विखे यांचेकडून 300 रेमडेसिवीर इंजेक्शन जिल्ह्याला मोफत

jalgaon-digital
2 Min Read

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

भाजपाचे जेष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील परिवाराने नगर जिल्ह्याकरिता 300 रेमडीसिव्हर इंजेक्शनची विनामूल्य उपलब्धता करुन

देत मोठा दिलासा दिला आहे. राहाता तालुक्यात एक हजार रुग्णांकरिता सुविधा होईल, अशी आरोग्य यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न केला असल्याचे आ. विखे पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोव्हीड रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने रेमडीसिव्हर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. परंतु इजेक्शनचा तुटवडाही मोठ्या प्रमाणात निर्माण झाला. वाढीव दराने होत असलेल्या विक्रीतून होत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी अडचण दूर करण्यासाठी आ. विखे आणि खा. सुजय विखे पाटील यांनी जिल्ह्यात तिनशे रेमडीसिव्हर इंजेक्शनची उपलब्धता करून दिली.

तिनशे पैकी शंभर इंजेक्शन येथील सुपर स्पेशालीटी हॉस्पिटल शिर्डी, प्रवरा ग्रामीण रुग्णालय आणि नगर येथील सिव्हील रुग्णालयास देण्यात येणार आहेत.

शिर्डी येथील साई सुपर स्पेशालीटी हॉस्पिटलमध्ये शंभर इंजक्शन आ. विखे पाटील यांनी प्रांताधिकारी गोविंद शिंदे आणि रुग्णालयाच्या अधिकार्‍यांकडे सुपूर्द केले. याप्रसंगी साई संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, अभय शेळके, नगररसेवक सुजित गोंदकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के आदींसह वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

आ. विखे पाटील म्हणाले की, कोव्हीड रुग्णांची वाढती संख्या पाहता राहाता तालुक्यात सर्व रुग्णालय मिळून आता एक हजार रुग्णांची व्यवस्था होईल अशा पध्दतीची यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न हा बहुदा राज्यातील पहिला प्रयोग असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये प्रामुख्याने ऑक्सिजन बेड आणि ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहील. यावर सर्व विभागांनी लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

सध्याची परिस्थिती पाहता कोण काय बोलतो आणि काय करतो याकडे लक्ष देण्यापेक्षा संकटात असलेल्या जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सहकार्य करण्याची आमची भूमिका आहे. आम्ही यापूर्वी जनतेसाठी सामाजिक बांधिलकीने काम केले. भविष्यात यासाठी तत्परच राहू, असे आ. विखे पाटील म्हणाले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *