Friday, April 26, 2024
Homeनाशिकवावी : बंधार्‍याच्या खोदकामाला ग्रामस्थांचा विरोध

वावी : बंधार्‍याच्या खोदकामाला ग्रामस्थांचा विरोध

वावी । Vavi (वार्ताहर)

प्रमाणापेक्षा जास्त खोदकाम करणार्‍या समृद्धीच्या ठेकेदाराला मीठसागरे येथील शेतकर्‍यांनी विरोध केला असून तत्काळ काम बंद करा, अशी मागणीदेखील त्यांनी सदर कंपनीला दिलेल्या निवेदनात केली आहे.

- Advertisement -

यासाठी येथील विरोध करणार्‍या शेतकर्‍यांना पोलीस ठाण्याकडून धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप या शेतकर्‍यांनी केला आहे.

मीठसागरे शिवारातील जाधव वस्तीनजीक असलेल्या बंधार्‍यात सध्या खोदकाम सुरू आहे. मात्र, खोदकाम करताना शासनाने ठरवून दिलेल्या नियमांची पायमल्ली संबंधित ठेकेदार करत असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

मुंबई- नागपूर व सिन्नर-शिर्डी या महामार्गाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या कामाकरता मुरूम, माती काढण्याचे काम या दोन्ही कंपनीचे ठेकेदार करत आहे. मीठसागरे येथील जाधव बंधार्‍यातील खोदकाम प्रमाणापेक्षा जास्त झाल्याने परिसरातील विहिरींचे पाणी या बंधार्‍यात पाझरत असल्याने शेतकर्‍यांचे विहिरींचे पाणी कमी होऊ लागले आहे.

त्यामुळे या वस्तीवरील शेतकर्‍यांनी प्रमाणापेक्षा जास्त खोदकाम करत असलेल्या ठेकेदारास विरोध केला. याबाबत शेतकर्‍यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांचीही भेट घेऊन त्यांना कंपनीकडून कायद्याच्या होत असलेल्या पायमल्लीबाबत तक्रार केली.

संबंधित ठेकेदार बंधार्‍यात खोदकाम करताना मिळणार्‍या वाळूची बेकायदा वाहतूक करून परस्पर विक्री करत आहे. काम करत बंधार्‍यात खोदकाम हे समप्रमाणात करावे व उत्खनन करताना वाळू उपलब्ध झाल्यास उत्खनन करता येणार नाही, असे नियम शासनाच्या माहिती पत्रकात नमूद करण्यात आले आहेत.

असे असताना त्याकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा शेतकर्‍यांचा आरोप वसंत कासार, चंद्रभान कासार, गोरख पगार, अशोक कासार, निवृत्ती कासार, नंदाराम जाधव, बाबासाहेब कासार, साहेबराव कासार, मधुकर कासार, गणपत कासार, किरण जाधव, बाळू जाधव, गंगाधर कासार, सोपान कासार, दिगंबर जाधव, महेश कासार, सुदाम कासार या शेतकर्‍यांनी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या