Friday, April 26, 2024
Homeनंदुरबारशेतकर्‍यांना वीज मिळत नाही अन् शासकीय कार्यालयांमध्ये विजेचे गांभीर्य नाही

शेतकर्‍यांना वीज मिळत नाही अन् शासकीय कार्यालयांमध्ये विजेचे गांभीर्य नाही

चेतन इंगळे – मोदलपाडा, ता.तळोदा :

पाण्याच्या समस्येप्रमाणेच विजेची समस्याही आज मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. एकीकडे पुरेपूर वीज मिळत नसल्यामुळे शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांना फार मोठ्या प्रमाणात विजेच्या संकटाला सामोरे जावे लागत असते.

- Advertisement -

परंतु तळोदा येथील शासकीय कार्यालयात कोणीही नसताना देखील विजेचा असा गैरवापर करणे कितपत योग्य आहे? याचाही विचार याठिकाणी होणे गरजेचे आहे.

विजेची समस्या ही तळोदा तालुकावासीयांसाठी व शेतकर्‍यांकरीता डोकेदुखी ठरत आहे. ग्रामीण भागात तर वीज पुरवठयाचे कोणतेच वेळापत्रक नसल्याने भर उन्हाळ्याच्या दिवसात त्रास सहन करावा लागत आहे.

भर पावसाळ्यात देखील अंधारात दिवस काढावे लागत असतात. खरीप व रब्बी हंगामाच्या कालावधीत बागायतदार शेतकर्‍यांना रात्री बेरात्री वीजेचा पुरवठा मिळत असल्यामुळे शेतातील पिकांना वाचवण्याकरिता अंधारात पाणी द्यावे लागत असते. याचे मुख्य कारण म्हणजे विजेचा अपूर्ण साठा.

परंतु विजेची ही अपूर्णतः शेतकरी व ग्रामीण नागरिक यांच्याच माथी का मारल्या जात आहे, याचाही विचार करणे गरजेचे आहे. याउलट तळोदा शासकीय कार्यालयात विजेच्या होत असलेल्या गैरवापराकडे महावितरणने लक्ष देणे गरजेचे आहे.

वीज वापराचे बिल शासकीय कार्यालयाकडून महावितरणला प्राप्त होत असले तरीही अतिरिक्त विजेच्या वापरावर बंधन घालणे हे महावितरणाचे अथवा त्यांच्या शासकीय कार्यालयांचे कर्तव्य नाही काय? अनेक शासकीय कार्यालयांमध्ये कोणी नसतांना लाईट, पंखे सुरू असतात याचे कारण काय?

एकीकडे शासनाकडून विजेची बचत करण्याचा मूलमंत्र दिला जातो तर दुसरीकडे त्यांच्या शासकीय कार्यालयात वीज बचतीच्या नियमावलीची पायमल्ली होत आहे. आधी केले मग सांगितले या म्हणीचा अर्थ जोपर्यंत अनेकांच्या लक्षात येत नाही, तोपर्यंत विजेच्या बचतीचा मूलमंत्र अंगवळणी पडणे शक्य नाही.

याउलट केवळ आठ तासांच्या कालावधीत ज्या शेतकर्‍यांच्या शेतात विजेचा पुरवठा केला जातो त्याच शेतकर्‍याला त्या आठ तासांच्या विजेचे महत्व काय असते, हे त्याच्या रात्री बेरात्री केल्या जात असलेल्या मेहनतीवरून लक्षात येते.

सर्व शासकीय कार्यालये ही शहरात असल्याने अश्या भागात कोणतीच अडचण निर्माण होत नाही. त्यामुळे त्यांना विजेचे महत्व समजत नाही.

परंतु हीच परिस्थिती ग्रामीण भागात राहणार्‍या नागरिकांच्या आयुष्यात कधी निर्माण होणार याची ग्रामीण जनता मोठ्या उत्सुकतेने आजही वाट पाहत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या