Tuesday, May 14, 2024
Homeनाशिकलसीकरणात अनास्था चिंताजनक : डॉ. ठाकरे

लसीकरणात अनास्था चिंताजनक : डॉ. ठाकरे

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

मुलांनी निरोगी आयुष्य जगावे हे पुर्णत: पालकांच्या हातात आहे. बाळाने जन्म घेतल्यापासून तो पाच वर्षाचा होईपर्यंत आवश्यक सर्व लसी घेतल्या पाहिजे. परंतू गैरसमज अथवा भितीपोटी बालकांचे लसीकरण (Vaccination of children)केले जात नसल्याने त्याचे दुष्पपरिणाम दिसू लागले आहेत.

- Advertisement -

आरोग्य यंत्रणातर्फे लसीकरणाचा टक्का वाढावा यासाठी सातत्याने प्रयत्न होत असले तरी लसीकरणाचा दिसून येत असलेला अभाव चिंताजनक ठरू लागला आहे. बालकाचे जीवन आरोग्यमय राहावे यासाठी सर्व लसीकरण करणे काळाची गरज बनली असल्याचे प्रतिपादन मनपा आरोग्याधिकारी डॉ. सपना ठाकरे( Dr. Sapana Thackeray ) यांनी येथे बोलतांना केले.

येथील मराठा दरबार सभागृहात युनिसेफ व चरखा या संस्थांच्या वतीने मिशन इंद्रधनुष्य (Mission Indradhanushya )व नियमित लसीकरण वाढण्याच्या दृष्टीकोनातून आयोजित चर्चासत्रात मार्गदर्शन करतांना आरोग्याधिकारी डॉ. ठाकरे बोलत होत्या. मनपा वैद्यकिय अधिकारी डॉ. अलका भावसार, उपक्रम व्यवस्थापक अलका गाडगीळ, समन्वयक सुजाता शिर्के, मौलाना असद अहमद आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.

लसीकरणाअभावी नवजातांसह बालक व मुलांना उद्भवत असलेल्या विविध दहा गंभीर आजारांची माहिती देत डॉ. ठाकरे पुढे म्हणाल्या, लहानपणी लस न घेतल्यामुळे त्याचा त्रास बालकांना वयात आल्यावर देखील होत असतो.

जन्म झाल्यापासून ते वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत सात लस घेणे आवश्यक आहे. परंतू याकडे दुर्लक्ष केले जाते. दवाखान्यात प्रसुती झाल्यास सर्व प्राथमिक लसीकरण केले जातात. जीवनसत्वांची मात्रा नवजात बालकाला दिली जाते. त्यामुळे अनेक आजारांपासून या बालकाचे संरक्षण होते. लसीकरणाची काळजी घेतली न गेल्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत असून ते निश्चितच चिंता वाढविणारे ठरले असल्याचे ठाकरे यांनी पुढे बोलतांना स्पष्ट केले.

रात्रपाळीत काम करून वडिल दिवसा घरी आराम करतात. लस घेतल्यास बाळ रडेल या कारणावरून लस घेण्याचे टाळले जाते. परंतू हा निर्णय पुर्णत: चुकीचा आहे. एक-दोन दिवस बाळ रडणे चालेल परंतू लस न घेतल्यास त्याच्यासह कुटूंबास आयुष्यभर रडावे लागेल हे विसरता कामा नये. आरोग्य यंत्रणेचे पथक घरोघरी जावून लसीकरणाबाबत जनजागृती व पाठपुरावा करत आहेत. मात्र लसीकरण महत्वाचा अभाव, गैरसमज व भितीपोटी अद्याप लस घेणे टाळले जाते. बालकाच्या निरोगी आयुष्यासाठी सर्व लसीकरण आवश्यक असल्याने या संदर्भात धार्मिक, सामाजिक संघटनांसह कार्यकर्त्यांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता डॉ. ठाकरे यांनी शेवटी बोलतांना व्यक्त केली.

यावेळी मार्गदर्शन करतांना मनपा वैद्यकिय अधिकारी डॉ. अलका भावसार यांनी लसीकरणाची माहिती दिली. मिशन इंद्रधनुष्य ही केंद्र सरकारची आरोग्य विभागासाठी महत्वकांक्षी योजना असून या वर्षाअखेर देशातील 90 टक्के नागरीकांचे लसीकरण पुर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असल्याचे सांगितले. लसीकरणाअभावी लहान मुलांना होवू शकणार्‍या आजाराबाबत जागतिक आरोग्य संघटना व युनिसेफतर्फे व्यक्त करण्यात आलेल्या चिंतेकडे त्यांनी लक्ष वेधले.

लहान बालके व युवकांचे लसीकरण न झाल्यास करोनाचा धोका पुन्हा वाढू शकतो, असा इशारा आरोग्य संघटना व युनिसेफतर्फे देण्यात आला आहे. त्यामुळे मुलांचे आवश्यक सर्व लसीकरण व्हावे यासाठी पालकांना पुढाकार घेण्याची अपेक्षा डॉ. भावसार यांनी व्यक्त केली.

यावेळी मार्गदर्शन करतांना मौलाना असद यांनी लसीकरणाबद्दल मुस्लीम बांधवांनी कुठलाही गैरसमज न ठेवण्याचे आवाहन यावेळी बोलतांना केले. लसीकरण नसल्यास विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मुलांचे आरोग्यमय जीवन पालकांच्या हातात असल्याने त्यांनी कुठलीही भिती न ठेवता लसीकरण करावे, असे सांगितले. यावेळी उपक्रम व्यवस्थापक अलका गाडगीळ, समन्वयक सुजाता शिर्के यांनी परिषदेचा उद्देश सांगत युनिसेफ व चरखा या संस्थांच्या कामकाजाची माहिती दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या