Friday, April 26, 2024
Homeब्लॉगचुकूदे आणि शिकूदे !

चुकूदे आणि शिकूदे !

जीवनात यश मिळावे म्हणून शिक्षणाने मदत करायची असते असे म्हटले जाते, पण नेमके यश म्हणजे काय ? हे मात्र कळत नाही. आपण यशाचा पाठलाग करतो म्हणजे नेमके काय करीत असतो.. ? यशाची नेमकी व्याख्या काय असते… ? परीक्षेत मिळणारे 99 टक्के 100 गुण म्हणजे यश असते का ? जीवनात अमाप संपत्ती मिळविणे म्हणजे यश असते का ? यश जर सर्वांना हवे असेल तर यशाची एकच व्याख्या असायला हवी.आज बाजारात यशाचे मार्ग दाखविणारे माणंस कमी नाहीत.

अनेकांनी य़श कसे प्राप्त करावे यासाठी पुस्तके लिहिले आहेत. अनेकांनी यशाच्या मार्ग दाखविणारी व्याख्याने दिली आहेत, पण व्याख्यान ऐकणारी आणि पुस्तके वाचणारी वाचकापैंकी सर्वच यशस्वी झाले आहेत असे घडत नाही. एकाच शिक्षण प्रक्रियेतून कोणी उत्तम वक्ता होता, कोणी लेखक, कोणी प्रशासकिय अधिकारी, कोणी नेता, कोणी प्रचंड श्रीमंत होतो. कोणी गरीब राहातो, मग यश कोणते… ? गरीब राहणे की श्रीमंत होणे? शिक्षण यशाचा मार्ग खरच दाखवतो, की फक्त परीक्षा उत्तीर्ण करण्याकडे कल असतो ? शिक्षण नेमके करते काय? हा प्रश्न पडतोच. पण शिक्षण वर्तमानातील व्याख्येप्रमाणे यशाच्या एका दिशेने घेऊन जात नाही म्हणून शिक्षणातून एक सारखा माणूस निर्माण करीत नाही आणि एक समान व्यक्तिमत्व घडविणे हे शिक्षणाचे उददीष्टे देखील नाही. शिक्षण फक्त प्रत्येकाच्या आत जे काही दडले आहे त्याचा फक्त विकास करते. त्यामुळे यशाच्या शिखराची प्रत्येकाची परीभाषा भिन्न असते आणि त्यासाठी सर्वच जन प्रयत्न करीत असतात.

- Advertisement -

जगात यशस्वी होण्यासाठी अनेकदा असे म्हणतात , की यशस्वी माणंसाच्या जीवनाचे अनुभवाची बांधणी असलेली पुस्तके वाचा म्हणजे यशाचा मार्ग सापडेल. अशी यशाची उंची गाठलेल्या माणंसाच्या आय़ुष्यात यशाचा मार्ग सुलभ नसतो हे सहज लक्षात येईल.त्यासाठी प्रचंड संघर्ष करावो लागतो.यशासाठी कष्ट, कष्ट आणि कष्ट या शिवाय कोणताही मार्ग नसतो म्हणून तर माजी राष्ट्रपती अब्दूल कलाम म्हणायचे रात्री जो कोणी स्वप्न पाहातो आणि स्वप्न पडल्यावर जो पुन्हा झोपतो ते स्वप्न नाहीच, तर ज्याला स्वप्न पडल्यावर झोप येत नाही ते खरे स्वप्न असते. अशा स्वप्नांच्या मागे लागणे हे माणसाचे ध्येय असायला हवे आणि त्या करीता शिक्षणाने दिशा दाखवायला हवी.

शिक्षण तर फक्त यशाचे मार्ग केवळ यशाचे स्वप्न दाखवित असेल तर ते शिक्षण कुचकामी आहे. यशासाठी प्रयत्न करणे सोडणे म्हणजे अशिक्षित पणा आहे.अशा परीस्थितीत शिक्षणातून यशाचे मार्ग दाखविणे नको तर ज्ञानासाठी शिकण्याची प्रक्रिया होण्याची अत्यंत गरज आहे. शिकणे जितके उत्तम आणि चूका करीत होते तितके यशाचे मार्ग जवळ असतात. मुळतः शिक्षणाने चूका करण्यासाठी मानसिक तयारी करण्याची गरज असते .जीवनात काय आणि शिक्षणात काय अधिकाधिक चूका करण्याची संधी देण्याची गरज असते.जी माणंस अधिकाधिक चूका करतात ती माणस यशाच्या जवळ पोहचतात. ते यश अधिक काळ टिकणारे आनंद देणारे असते. कोणी यशस्वी झालेल्या माणंसाच्या पाऊलवाटेने जात राहाण्याने य़श मिळेल असे होत नाही.

कदाचित यश मिळेल पण ते कायम स्वरूपी टिकणारे असेलच असे घडणार नाही.मात्र चूका करीत शिकणारे विद्यार्थी जीवनात अधिक यशस्वी होतात.एकदा एक चूक केली आणि ती चूक दुरूस्त केली तर पुन्हा नवी चूका घडत राहातात, पण या प्रवासात अगोदरची चूक पुन्हा होण्याची शक्यता नसते. कारण प्रत्येक चूक दुरूस्ती करीत पुढे जाणे म्हणजे एक नवा घटक शिकणे असते. अशा अनेक चूका दूर करीत राहाणे म्हणजे प्रत्येक चूकात आणखी एक नवे शिकणे असते. त्यामुळे या चूका करीत शिकत राहाणे म्हणजे यशाचे शिखर पादाक्रांत करणे असते.त्यामुळे जीवन काय आणि शिक्षण काय दोन्ही ठिकाणी यशाला कोणताही शॉर्टकट नसतो. दुर्दैवाने वर्तमानात यशासाठी अनेकदा शॉर्टकट शोधला जातो. हे शॉर्टकट यशापर्यत पोहचवितांना दिसतात पण ते कायम स्वरूपी समाधान आणि आनंद देणारे, ज्ञानाचे समाधान देणारे नसते. त्यामुळे मुलांना य़शाचा मार्ग दाखविला पाहिजे. पण तो मार्ग चूका करण्याचे स्वातंत्र्य प्रदान करीत पुढे जाणारा असायला हवा.

अनेकदा पालक म्हणून आणि शिक्षक म्हणून यशाचे मार्ग आखून दिले जातात.ज्यात चूका करण्याची संधी मिळत नाही किंवा ती मिळू नये म्हणूनच ते मार्ग दाखविले जातात.त्यामुळे चूका होण्याची शक्यता कमी असते.आम्ही ज्या मार्गाने चाललो आहोत तो मार्ग अधिक उत्तम आहे.त्याच मार्गाने तुम्ही चालत राहा असेच जणू सांगणे असते. मोठी माणंस ज्या मार्गाने चालत राहिली ती त्यांची पाऊलवाट होती. ती पुढच्या पिढीची नसते.त्यामुळे अनेकदा मोठी माणंस चूका करण्याची प्रक्रियाच जणू नाकारत असतात. त्यामुळे यशाच्या दिशेने जाणे घडत असले , तरी शिकणे घडत नाही. केवळ विश्वास ठेवणे घडते. मी सांगतो ते काही चूकीचे आहे का ? असा त्यांचा सवाल असतो. किंवा ज्यांनी पुस्तकात सांगितले आहे तो त्यांचा अनुभव असतो.त्यामुळे त्या दिशेन जा असं म्हणताना विचार करणे, चिंतन, मनन करण्याची प्रक्रियाच उरत नाही. अशा पध्दतीने शिकणे ही देखील अंधश्रध्दा आहे.

शिकण्यात प्रत्येक वेळी शिकण्याचे मार्ग जिज्ञासेच्या वृत्तीने पुढे जायला हवे असतात. एका मुलांने दोन मांजरे पाळली होती.विद्यार्थी दशेत प्राणी पाळण्याची वृत्ती असते. त्यांच्या प्रति संवेदना असतात. त्यांना थंडी वाजेल म्हणून त्यांच्यासाठी घर करण्याचा प्रयत्न केला. त्या प्रमाणे या मुलांने घर केले . त्या घरातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी दोन दरवाजे केले होते, कारण एकाच घरात पिलू आणि त्याची आई राहाणार होती. मग बाहेर पडतांना पिलाला एक दरवाजा आणि आईला एक दरवाजा असा त्यांने अंदाज बांधला होता. पण आई ज्या दरवाज्यातून जाता येईल त्या दरवाज्यातून पिलाला पण जाता येईल असा साधा अंदाज देखील बांधला आला नसेल का.. ? पण लहान वयात त्या मुलाला अंदाज बांधता आला नाही. त्यांने ती चूक केली . त्याला चूका करण्याचा अधिकार मिळाला होता. म्हणून पुढे हा मुलगा जगप्रसिध्द वैज्ञानिक बनला. तो होता न्यूटन. य़ा चूकाकडे पाहात शिकणे घडते.

एकदा चूक केली आणि ती दुरूस्त करण्याची संधी मिळाली की शिकणे पक्के होते. त्यातून जीवन व्यवहारासाठी दृष्टी आणि दृष्टीकोन मिळतो. अशाच एका महान शास्त्रज्ञाची प्रयोगशाळा जळत होती. ती जळत असतांना पाहाणारा प्रत्येकजन हळहळत होता, आणि तो महान शास्त्रज्ञ थॉमस एडिसन मात्र स्वतःची प्रयोगशाळा जळतांना फक्त म्हणत होता. माझ्या आयुष्यात या प्रयोगशाळेत ज्या काही चूका केल्या आहेत त्या सर्व चूका जळत आहेत. त्या प्रयोगशाळेत त्यांनी जितके म्हणून शोध लावले ते शोध केवळ अनेक चूकांचा परिपाक होता. अशा परीस्थितीत आपण चूका करीत नसतो तर शोधाच्या, य़शाच्या शिखरावर प्रत्येक पायरी वरती चढत असतो.त्यामुळे चूकांचे अधिकार नाकारतो तेव्हा आपण त्यांना यशाच्या शिखर पादाक्रांत करण्याचा अधिकारापासून दूर नेत असतो.त्यादृष्टीने घर असू दे नाही तर शाळा प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी चूका करण्याची संधी देण्याची गरज आहे.आपण जेव्हा मुलांना केवळ आपल्या अनुभवाच्या आधारे यशाचा रस्ता दाखवितो तेव्हा त्यांना कायमस्वरूपी यश मिळत नाही आणि त्या शिखरावर कायम स्वरूपी नाव मिळविता येत नाही. शाळा,शिक्षक,पालक जेव्हा एकाच मार्गाने चालण्याचा मार्ग दाखविता तेव्हा मुलांचे शिकणे नाकारत असतो हे लक्षात घेण्याची गरज आहे.

एखादा विद्यार्थी जेव्हा चूका करायला घाबरत असतो.तेव्हा त्याचा अर्थ तो कधीच शिकू शिकत नाही. मोठी माणंस नेहमी चूका करतात..ते शिकतात पण लहानाना त्या चूका करण्यासाठी नाकारले जाते.त्यातून आपण विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होणारी जिज्ञासा, उपक्रमशिलता, मज्जा, हौस एक प्रकारे नाकारत असतो. विद्यार्थी यास मुकतो. शिकतांना आपण जेव्हा प्रत्येकवेळी शंका घेतो. प्रयोग करतो. नव्या पाऊलवाटा शोधत राहातो. आपण जेव्हा पंरपराना नकार देत कृतीने शिकण्यासाठी तयार होऊ तेव्हा आपण शिकण्यासाठी अधिक तयार झालो असे म्हणता येईल. अनुकरणाच्या वाटेने जाणारा प्रवास शिक्षणापासून दूर लोटतो. तर चूका करीत शिकण्याचा प्रवास ज्ञाना पंर्यत आणि नव्या संधीत रूपांतरित करीत असतो. या चूकांनी विद्यार्थी शिकतात त्या प्रमाणे शिक्षक देखील आपल्या अध्यापनाच्या केंद्रस्थानी या चूका लक्षात घेऊन अध्ययन अध्यापनाच्या दिशा निश्चित करू शकेल. त्यामुळे अधिक प्रभावी आणि परिणामकारक अध्यापन घडेल ते आंनदाच्या वाटेने जाणे घडेल. ज्या क्षेत्रात चूका करणा-यांचे स्वागत होते तेथेच नव्यांने काही निर्माण होते.तेथे सर्जनशीलता बहरते. त्यामुळे चुकूदे आणि शिकूदे असे म्हणण्याची वेळ आली आहे.

संदीप वाकचौरे

( लेखक शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक आहेत.)

- Advertisment -

ताज्या बातम्या