एकल महिलांच्या वारस नोंदीसाठी विशेष अभियान

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

पतीच्या निधनानंतर त्यांच्या मालमत्तांना करोना एकल महिलांची वारस नोंद लावण्यासाठी महसूल विभागाच्यावतीने विशेष अभियान राबविण्याचा निर्णय श्रीरामपूर तालुका मिशन वात्सल्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

निवासी नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. संजय गांधी निराधार योजना विभागाच्या नायब तहसीलदार चारूशिला मगरे-सोनवणे, सहायक गटविकास अधिकारी उस्मान शेख, तालुका आरोग्याधिकारी डॉ. राजश्री देशमुख, अशासकीय सदस्य मिलिंदकुमार साळवे, बाळासाहेब जपे, तालुका संरक्षण अधिकारी दीपाली भिसे, नगरपालिकेचे समुदाय संघटक हरिष पैठणे, तालुका उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाचे शिरस्तेदार अण्णासाहेब चिंधे प्रमुख उपस्थित होते.

प्रभारी बालविकास प्रकल्पाधिकारी शोभा शिंदे यांनी बैठकीचे इतिवृत्त वाचन केले. तसेच तालुक्यातील एकल महिलांसाठी 30 मे रोजी आयोजित पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिराचा 212 महिलांनी लाभ घेतला. यात 33 महिलांनी घरकुलासाठी तर 35 महिलांनी संजय गांधी योजनेसाठी, 16 महिलांनी बालसंगोपन योजनेसाठी अर्ज केले होते. प्राप्त अर्ज कार्यवाहीसाठी संबंधित विभागांकडे पाठविल्याचे त्यांनी सांगितले.

शिबिरात आलेले सर्व अर्ज निकाली काढल्याचे नायब तहसीलदार मगरे-सोनवणे यांनी सांगितले. बालसंगोपन योजनेचे अर्ज आता पंचायत समिती कार्यालयात स्वीकारले जात असल्याने पालकांना अर्ज जमा करण्यासाठी नगरला जावे लागणार नाही, असे भिसे यांनी सांगितले. बचत गटांना बँका सहकार्य करीत नसल्याची तक्रार पैठणे यांनी केली.

करोना एकल महिलांना पतीच्या निधनानंतर वारस नोंदी लावण्यात अडचणी येतात. त्यामुळे महसूल विभागाने पुढाकार घेऊन यासाठी विशेष अभियान राबविण्याची सूचना मिलिंदकुमार साळवे यांनी केली. त्यानुसार तलाठ्यांना सूचना देऊन अभियान राबविले जाईल, असे निवासी नायब तहसीलदार वाकचौरे यांनी सांगितले.

तालुका आरोग्याधिकारी डॉ. राजश्री देशमुख यांनी आयुष्मान भारत योजनेची माहिती दिली. नव्या शासन निर्णयानुसार मुले 25 वर्षांची झाली तरी गरजू महिलांना संजय गांधी योजनेचा लाभ मिळावा, अशी सूचना बाळासाहेब जपे यांनी केली. बैठकीस समितीचे सदस्य असलेले प्रमुख अधिकारी गैरहजर होते. त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेश समितीचे अध्यक्ष तथा निवासी नायब तहसीलदार श्री. वाकचौरे यांनी दिले.

महिलेस पावसाळ्यातही निवारा नशिबी नाही

उंबरगाव येथील करोना एकल महिला कविता परभणे यांच्या मंजूर घरकुलाचा हप्ता पंचायत समितीने रोखून धरला आहे. याबाबत गटविकास अधिकार्‍यांकडे सुनावणीदेखील झाली. पण महिनाभरानंतरही याचा निकाल न दिल्याने या महिलेस पावसाळ्यातही निवारा मिळू शकलेला नाही, याकडे श्री. साळवे यांनी लक्ष वेधले.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *