Saturday, April 27, 2024
Homeनाशिकपोलीसांचे वाहन मोडकळीस

पोलीसांचे वाहन मोडकळीस

वावी । संतोष भोपी

येथील वावी पोलीस ठाण्यातील (Vavi Police Station) सेवकांना गस्तीसाठी व इतर कामांसाठी असलेले वाहन मोडकळीस आले असून या वाहनाने (Vehicle) चोरट्यांचा पाठलाग करणे दुरच, भर रस्त्यातच वाहन नादुरुस्त झाल्यास पोलिसांना पायपीट करण्याची वेळ या वाहनामुळे येते. त्यामुळे या वाहनाऐवजी पोलीस ठाण्याला नूतन वाहन देणे गरजेचे बनले आहे…

- Advertisement -

पोलिसांची (police) दळणवळणाची गरज पूर्ण करण्यासाठी १९४८ मध्ये वाहन परिवहन विभागाची स्थापना करण्यात आली. त्यावेळी राज्यात या विभागाचे नेतृत्व पोलीस अधिक्षकाच्या नेतृत्वाखाली अधिकारी करत असत. राज्य पोलीस दलाच्या कार्यक्षमतेमध्ये दळणवळण अत्यंत महत्त्वाचे आहे.

कायदा व सुव्यवस्थेच्या समस्या हाताळणे, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी बंदोबस्त राखणे आणि पोलिसांचे सामान्य कामकाज या सगळ्याच्या दृष्टीने यांत्रिकदृष्ट्या खात्रीशीर वाहनांची गरज नेहमीच भासते. मात्र, अशा परिस्थितीत वावी पोलीस ठाण्याच्या वाहनाची सध्याच्या परिस्थितीत दयनीय अवस्था झाली आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी तात्काळ वाहनाची व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

वावी पोलीस ठाण्याच्या अतंर्गत जवळपास ४० ते ४५ गावांचा समावेश होतो. याकरता सेवकांना वाहन कमी पडत आहे. हे वाहन केव्हाही व कधीही बंद पडते. त्यामुळे पोलिसांच्या कामात व्यत्यय निर्माण होतो. महत्त्वाच्या कामाला या वाहनाचा काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे येथील सेवकांना खासगी वाहनाचा उपयोग करावा लागतो. धावत्या व डिजिटल युगात अशा पद्धतीचे वाहन असल्यास पोलिसांच्या हाती गुन्हेगार कसे लागतील असा प्रश्न विचारला जात आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी (Superintendent of Police) याबाबत विचार करुन पोलीस ठाण्याला नवीन वाहन द्यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

अपघाताची शक्यता

पोलीस ठाण्यातील सेवकांना सर्वच कामांसाठी हे एकमेव वाहन असल्याने त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यामुळे या वाहनाचे सर्वच भाग खिळखिळे झाल्याचे दिसून येते. कामाच्यावेळी हे वाहन कुठेही बंद पडत असल्याने सेवक हे वाहन चालवण्याकडे कानाडोळा करतात. मात्र, गरजेच्या वेळी सेवकांना जीव धोक्यात घालून वाहन चालवावेच लागते. या वाहनाचा अपघात होऊन जीवितहानी होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या