Saturday, April 27, 2024
Homeनगरसाखर कारखान्यांनी इथेनॉलचे पंप टाकावेत

साखर कारखान्यांनी इथेनॉलचे पंप टाकावेत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भारत सरकारने इथेनॉलचे पंप टाकण्यास मंजूरी दिली आहे. यामुळे इथेनॉलचे उत्पादन वाढवणे आवश्यक आहे. साखर कारखान्यांनी साखरेऐवजी इथेनॉल उत्पादनावर भर द्यावा. सध्या 465 कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन होत असून देशात 1650 कोटी लिटर इथेनॉलची गरज आहे. जेवढे इथेनॉल तयार होईल, तेवढे सरकार विकत घेण्यास तयार आहे. यामुळे साखर कारखान्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात पंप टाकवेत. विशेष करून नगर आणि पुण्यातील खासदार, आमदार यांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितिन गडकरी यांनी केले.

- Advertisement -

मंत्री गडकरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत रस्ते विकास मंत्रालयाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले यांच्यासह जिल्ह्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री गडकरी म्हणाले, इथेनॉल हे जैविक इंधन आहे. तांदूळ, मका आणि अन्य धान्यापासून इथेनॉल निर्मिती सुरू झालेली आहे. अमेरिका, ब्राझील आणि कॅनडामध्ये 100 टक्के इथेनॉलवर गाड्या चालतात. हा प्रयोग आपल्या देशात करायचा आहे. इथेनॉल हे पेट्रोलपेक्षा स्वस्त असून त्याचा वापर वाढल्यास पेट्रोलवर खर्च होणार्‍या 12 लाख कोटींपैकी 5 लाख कोटी वाचले आणि ते शेतकर्‍यांच्या खिशात गेले तर शेतकरी श्रीमंत होतील. यासाठी साखर कारखान्यांनी इथेनॉलवर भर द्यावा, कारखाने जिवंत राहिले तर शेतकरी जिवंत राहतील. दुसरीकडे कारखान्यांनी शेतकर्‍यांचे शोषण करून नयेत.

ब्राझीलमध्ये दुष्काळ असल्याने साखरेचे उत्पादन कमी झाल्याने साखरेला थोडा भाव मिळाला आहे. देशात मागणीपेक्षा अधिक साखरेचे उत्पादन होत असून यामुळे देशात नवीन साखर कारखान्याला बंदी घातली पाहिजे, अशी मागणी गडकरी यांनी केली. पश्चिम महाराष्ट्र हा दुध व्यवसायामुळे समृध्द झाला असून गायीच्या दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी केंद्र सरकार नवीन तंत्र वापरून आपल्या मूळ गीर गायीचे दुधाचे उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. यासह देशी 200 गायी पुन्हा तयार करण्याचा प्रयोग सरकार करत आहे. यासह गायीच्या गर्भ ट्रान्सप्लांट करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

पुणे, कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेल्या दूध उत्पादनाचे गडकरी यांनी कौतुक केले. मात्र, एकट्या पुणे जिल्ह्यात अथवा कोल्हापूर जिल्ह्यात संकलन होणारे दुध हे विदर्भापेक्षा जास्त असल्याची आम्हाला लाज आणि शरम वाटते, अशी कबूली त्यांनी मदर डेअरीच्या बैठकीत डेअरची चेअरमन आणि भारत सरकारच्या अधिकार्‍यांसमोर दिली, असल्याचा किस्सा सांगितला. यावेळी महाराष्ट्राचे दुग्धविकास मंत्री सुनील केदार हे देखील उपस्थित होते, असे गडकरी म्हणाले. महाराष्ट्रात भूसंपादन दर वाढवला. त्यामुळे भूसंपादन करण्यात अडचण येत आहे.

तो कमी करावा, अशी विनंती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना करणार आहे. नगर जिल्ह्यातून पाच राष्ट्रीय महामार्ग जाणार आहेत. ही कामे सुरळीत व्हावी, अडलेली भूसंपादन कामे मार्गी लागावीत, यासाठी जिल्हाधिकारी यांनी स्वत: बैठक घ्यावी, अशी सुचना गडकरींनी केली. तसेच, उड्डाणपूलाच्या कामासाठी माजी खासदार दिलीप गांधी यांनी खूप पाठपुरावा केला. आज ते नाहीत याचं दुःख आहे, असेही गडकरी.

मला बरेच आमदार रस्त्यांच्या कामाची यादी देतात. नगरमध्ये देखील अशी यादी देण्यात आली आहे. यामुळे मला प्रश्न पडतो की मी राज्याचा बांधकाम मंत्री झालो की काय. तुम्ही मला पाच-पाच किलोमीटरच्या सीआरएफची लिस्ट देणार असाल तर मी कसे काम करणार, असा सवाल त्यांनी केला.

देशाच्या विकासात 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पाणी, वीज, वाहतूक आणि संपर्क. त्यावर भर द्यावा लागेल. गरीबाला जात-धर्म नसतो. त्यामुळे देशातली गरिबी, बेरोजगारी दूर करायची असेल, मजूर-शेतकर्‍यांचं कल्याण करायचं असेल तर रोजगाराची निर्मिती करावी लागेल. त्यासाठी या 4 गोष्टींची व्यवस्था करावी लागेल, असं मंत्री गडकरी म्हणाले.

चांगल्या रस्त्यांविषयी बोलताना त्यांनी महाराष्ट्रात मंत्री असतानाची एक आठवण सांगितली. ते म्हणाले, राज्यात मंत्री असताना तेव्हा माझे सचिव असलेल्या तांबेंनी मला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांचं एक प्रसिद्ध वाक्य सांगितले होते. ते वाक्य होतं ‘अमेरिका श्रीमंत आहे म्हणून अमेरिकेतले रस्ते चांगले झालेले नाहीत. अमेरिकेतले रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत झाली.’

नागपूरमधील साखर कारखानदारीच्या अवस्थेवर गडकरींनी मिश्किल टिप्पणी केली. मी आमच्या केंद्रातल्या अधिकार्‍यांना सांगितलं की आमच्याकडे टिश्यू कल्चरचा ऊस लागतो. कारखानदारी म्हणायचे तर कोल्हापूरची साखर कारखानदारी मेरीटमधल्या विद्यार्थ्यांची शाळा वाटते, मराठवाडा म्हणजे फर्स्टक्लासमधल्या विद्यार्थ्यांची शाळा आणि विदर्भ म्हणजे ज्यांना 100 पैकी 20 पेक्षा कमी गुण मिळालेत त्यांची शाळा. पण आता आम्ही 50 नर्सरी तयार केल्या आहेत. त्यातून शेतकर्‍यांना रोपे मिळायला लागली आहेत, असे गडकरी म्हणाले.

सुरत- चेन्नई हा राष्ट्रीय महामार्ग नगरमधून जाणार असल्याने जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होणार आहे. नगर-पुणे वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाघोली-शिरूर या मार्गावर थ्री लेअर (तीन मजली) पूल-रस्ता करण्यात येणार आहे. कोपरगाव-सावळी विहिरी, तळेगाव-चाकण-नाव्हरा-जामखेड-पाटोदा, जामखेड-सौताडा या नवीन मार्गांचीही गडकरी यांनी घोषणा केली. नगरच्या उड्डाणपुलाची लांबी वाढविण्याबाबत अधिकार्‍यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे गडकरी म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या