…तर नगरमध्ये काँग्रेसचा आमदार शक्य

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर शहर हे काँग्रेस विचारसणीचे आहे. शहरातील गरिब, अल्पसंख्याक, व्यापारी आजही काँग्रेस पक्षाला मानणारा आहे.

त्यांना सोबत घेवून संघटनात्मक घोडदौड अशीच कायम ठेवली, तर नगरमध्ये नक्कीच मोठ्या मताधिक्याने काँग्रसेचा आमदार निवडून येईल, असा विश्वास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी व्यक्त केला.

शहरजिल्हा काँग्रेची संघटनात्मक आढावा बैठक थोरात यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी शहरातील काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांविरोधात रोष व्यक्त केला. महानगरपालिकेतील भाजप-राष्ट्रवादी युतीवर सडकून टीका केली.

राज्यात महाविकास आघाडी एकत्र असताना शहरात मात्र चुकीच्या पद्धतीने मित्र पक्ष वागत आहे. काँग्रेस शहरामध्ये त्यामुळे विरोधी बाकावर असून नागरिकांच्या प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी आक्रमक भूमिका घेत असल्याचे मंत्री थोरात यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करतांना मंत्री थोरात म्हणाले, काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठरवले तर ही गोष्ट अशक्य नाही. काँग्रेस हा विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. धर्मनिरपेक्षता हा काँग्रेसचा शास्वत विचार आहे. नगर शहरामध्ये काँग्रेसला मानणारा मोठा मतदार आहे. शहरामध्ये पक्षाची सुरू असणारी संघटनात्मक घोडदौड अशीच कायम राहिली तर वेळप्रसंगी नगर शहराचा महापौर देखील काँग्रेसचा होईल.

मी आपल्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. शहरातल्या विविध घटकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आवश्यक ती सर्व ताकद उभी केली जाईल. यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, ज्ञानदेव वाफारे, दीप चव्हाण, राजेंद्र नागवडे, संपतराव म्हस्के, फारुख शेख, उपाध्यक्ष खलिल सय्यद, सरचिटणीस नलिनी गायकवाड, विद्यार्थी काँग्रेसचे जाहीद शेख उपस्थित होते.

थोरातांचा विखेंना चिमटा

यावेळी मंत्री थोरात यांनी आ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. विधानसभा निवडणुकीच्या वेळी काहींना वाटले की भाजपमध्ये जावून मंत्री होवू. मात्र, आता त्यांच्यावर तोंड दाबून उभे राहण्याची वेळ आली. यामुळे कार्यकर्त्यांनी सरळ वाटचाल करा आणि विचारांवर ठाम राहा, असा सल्लाही यावेळी दिला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *