Thursday, April 25, 2024
Homeनगरमुरकुटे-ससाणे यांनी मेळ घातला तर...

मुरकुटे-ससाणे यांनी मेळ घातला तर…

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ससाणे-मुरकुटे यांच्यात समझोता झाला तो तसाच नगरपरिषदेच्या निवडणुकीत ठेवायचा की नाही हे त्या दोघांच्या हातात आहे.

- Advertisement -

दोघांनीही चांगल्या कामात एकमेकांना मदत करावी. एकत्र येऊन मेळ घातला पाहिजे. तरच ज्याला त्याला कारखाना व पालिका निवडणुका सहज सोप्या जातील, असा सल्ला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला.

श्रीरामपूर शासकीय विश्रमागृह येथे पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष सचिन गुजर आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हा बँकेची निवडणूक झाल्यानंतर चेअरमन, व्हा. चेअरमन निवडीच्यावेळी ‘सोधा’चे राजकारण झाले असल्याची टीका मुरकुटे यांनी केली होती.

त्यावर ना. थोरात म्हणाले, मुरकुटे माझे सोयरे आहे. यातील बहुतेकजण एकमेकांचे नातेवाईक आहेत. मुरकुटे मनमोकळेपणाने मनात काहीही न ठेवता बोलून गेले. त्यामुळे त्यांचे बोलणे मनावर न घेण्यासारखेच असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँगे्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व होते आणि त्यात भाजपाने माघार घेतल्यामुळे जिल्हा बँक निवडणूक सहज सोपी झाली. यापुढे जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा गावपातळीवरच्या निवडणुका स्थानिक पातळीवर मेळ बसवून लढवली गेली पाहिजे.

यावेळी सरकार टिकणार नाही, तुझं माझं जमेना अशी अवस्था झाली आहे असे भाजपाचे नेते बोलत असतात. यावर ना. थोरात म्हणाले, अशा प्रकारचे बोलणे म्हणजे त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्याचे काम करत आहेत.त्यांच्या भाषणाचा समारोप अशा पध्दतीने बोलल्याशिवाय होत नाही. त्यामुळे आमच्या सरकारचे काम खूप चांगल्या पध्दतीने चालू आहे.

मागील वर्षात करोनाचे सावट, त्यात अतिवृष्टी, वादळ आणि भूकंप अशा भयंकर अडचणी आल्यामुळे अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. तरीही या सर्व संकटांना सामोेरे जात सरकारने चांगल्याप्रकारे चालविले. विकास कामासाठी पैसा कमी पडला. केंद्राकडून पैसा मिळाला नाही, जीएसटीचा पैसाही दिला नाही. त्यामुळे आर्थिक स्त्रोत कमी पडले. करोनाने पुन्हा एकदा तोंड वर काढले आहे. आता प्रत्येकाने प्रत्येकाची काळजी घेणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

बेलापूरचे व्यापारी गौतम हिरण यांची जी निर्घुण हत्या झाली तो दुर्दैवी प्रकार आहे. पोलिसांनी आरोपी पकडून चांगले काम केले. या प्रकरणात जेे कोणी आरोपी असतील त्यांना कायद्याने कडक शिक्षा करावी, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या