Thursday, April 25, 2024
Homeनगरपोकळ आश्वासने देऊन वेळ मारून नेणारा मी कार्यकर्ता नव्हे- ना. तनपुरे

पोकळ आश्वासने देऊन वेळ मारून नेणारा मी कार्यकर्ता नव्हे- ना. तनपुरे

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

यापूर्वी लोकप्रतिनिधींधकडून तुम्हाला केवळ आश्वासनेच मिळाली असतील. मात्र, मी आश्वासन न देता वस्तुस्थिती पाहून प्रामाणिकपणे काम करण्यावर भर देतो. पोकळ आश्वासन देऊन वेळ मारून नेणारा मी कार्यकर्ता नाही. प्रश्नांची सोडवणूक कशा पद्धतीने करता येईल? याचा अभ्यास करून मार्गक्रमण करतो, अशी टीका राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली.

- Advertisement -

भारतीय जनता पक्षाच्या युवकांचे उपाध्यक्ष व वरशिंदे गावचे उपसरपंच दीपक वाबळे, आप्पासाहेब नेहे, एकनाथ विधाटे, गणेश नेहे या भाजपाच्या चार सदस्यांनी कार्यकर्त्यांसह राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी ना. तनपुरे बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते शांताराम नेहे होते. यावेळी राष्ट्रवादीचे युवकांचे तालुकाध्यक्ष धिरज पानसंबळ, शहराध्यक्ष संतोष आघाव, नगरसेवक नंदकुमार तनपुरे, सुयोग नालकर, अनिल घाडगे, एकनाथ तनपुरे, डॉ.सुभाष काकडे, इगतपुरीचे सरपंच शिवाजी गाढवे, पांडुरंग गाढवे, गुहाचे उपसरपंच रामा बर्डे आदी उपस्थित होते.

राज्यमंत्री तनपुरे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस हे एक कुटुंब असून या कुटुंबातील सर्वांना सारखी वागणूक दिली जाईल. तुम्ही प्रवेश करताना जे प्रश्न मांडले, त्यातील विजेचा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अग्रहक्काने मार्गी लावू, असे आश्वासन त्यांनी दिले. वरशिंदे व परिसरातील गावातील विकास साधण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला, त्यांचा योग्य तो सन्मान ठेवला जाईल. या गावातील पिण्याचे पाणी, विद्युतपुरवठा, रस्ते यासह अनेक कामे प्रलंबित आहेत. या भागातील विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी ताहराबाद व चिखलठाण सबस्टेशनद्वारे मार्ग काढला जाईल. कुरणवाडी व 19 गावे या योजनेतून वरशिंदे गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. वरशिंदे गावातील शेतकर्‍यांनी वीज बिलाचा प्रश्न मंत्री तनपुरे यांच्यासमोर मांडला. वर्षातून केवळ चारच महिने आमचे विद्युतपंप चालतात, आठ महिने बंद राहतात. मात्र, वीजबिल एका वर्षाचे भरावे लागते. यावर मंत्री तनपुरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत विद्युतपंपाला मीटर बसविण्याचा सल्ला दिला.

यावेळी उपसरपंच दीपक वाबळे व ग्रामपंचायत सदस्य गणेश नेहे यांनी विविध समस्या मांडल्या. कार्यक्रमास सुदाम नेहे, किसन नेहे, लक्ष्मण विधाटे, किरण गव्हाणे, दत्तात्रय नेहे, सुभाष थोरात, बाळासाहेब नेहे, निवृत्ती जाधव, आप्पासाहेब नेहे, मुबारक शेख, अंशाबापू नेहे, आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, सदस्य व नागरिक उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या