Sunday, May 5, 2024
Homeनगरमिनी स्टेडियम इमारतीचे रखडलेले काम त्वरित पूर्ण व्हावे

मिनी स्टेडियम इमारतीचे रखडलेले काम त्वरित पूर्ण व्हावे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरातील कर्मवीर चौक व नवीन न्यायालय इमारत शेजारी असलेल्या मिनी स्टेडियमचे अपूर्ण काम मागील काही वर्षांपासून बंद असून रखडलेल्या स्थितीत आहे.

- Advertisement -

तरी याबाबत मुख्याधिकार्‍यांनी त्वरित गांभीर्याने दखल घेऊन सदर श्रीरामपूरचे वैभव असलेले मिनी स्टेडियमचे काम त्वरित मार्गी लावून पूर्ण करावे, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष रवींद्र गुलाटी यांनी केली आहे.

परिसरातील वाढलेले गवत झाडेझुडूपे घाणीचे साम्राज्य सर्व परिस्थिती नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक यांच्या निदर्शनास काही सुज्ञ नागरिकांनी आणून दिल्यानंतर त्यांनी त्वरित स्वतः या परिसरात स्वच्छता मोहीम हाती घेतली.

त्याप्रसंगी मुख्याधिकारी श्री. ढेरे, पंचायत समिती गट विकास अधिकारी श्री. आभाळे, कामगार तलाठी श्री. घोरपडे, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र गुलाटी, नगरसेवक मुक्तारभाई शहा, दीपक चव्हाण, रवी पाटील, कलीम कुरेशी, नगर अभियंता राम सरगर, आरोग्य विभागाचे श्री. आरणे आदींसह परिसरातील नागरिक ,अधिकारी उपस्थित होते.

रवींद्र गुलाटी यांनी मुख्याधिकारी यांना संपूर्ण स्टेडियमची परिस्थिती दाखवून माहिती देण्यात आली. या ठिकाणी संध्याकाळचे दारुड्यांचे बियरबार सुरू असतात. तलाठी कार्यालयाच्या शेजारील इमारतीची सर्व दारे खिडक्या गायब झाल्या असून खेळण्यासाठी बॅडमिंटन हॉलचीही पावसाळ्यात दुर्दशा झालेली असते.

गर्दुलाचे झुंड तसेच गंजाडी वेगवेगळी नशा या ठिकाणी करत असतात. रात्रीचे सर्व प्रकारचे खेळ या मिनी स्टेडियममध्ये चालू असतात. या ठिकाणच्या गाळ्यांची परिस्थितीही अशीच आहे. मागील बाजूचे गाळ्यांचे काम अर्धवट स्थितीत आहे. पुढील गाळ्यांचे काम पूर्ण झालेले आहे परंतु सध्या गाळ्यांमध्ये व्यवसाय करणार्‍या गाळा धारकांच्या नावावर अजून गाळे करून देण्यात आलेले नाहीत.

व्यापार्‍यांसाठी व स्टेडियम मध्ये खेळाडूंसाठी असणार्‍या मुतार्‍यांचे कामही अर्धवट आहेत. पूर्वी या जागेवर राहत असलेल्या नागरिकांच्या गरीब कुटुंबिीयांनी वारंवार उपोषणे करून देखील त्यांना फक्त आश्वासने देण्यात आली अद्याप त्यांना घरे किंवा गाळे देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात आलेले नाही.

परिसरात देखरेख करण्यासाठी कोणीही वॉचमन नाही. कधीही स्वच्छता नाही. ठेकेदाराचाही मोठा गोंधळ असून ठेकेदार दुसरा व तिसर्‍यानेच गाळे धारकांकडून परस्पर पैसे घेऊन काम केलेले आहे, तसेच नगरपालिकेकडून सुद्धा मोठी रक्कम याच गाळ्यांच्या कामासाठी घेतलेली आहे. एकाच कामाची दोन्हीकडून रक्कम घेतलेली आहे.

शासनाचा लाखो रुपयांचा निधी मिळवूनही अधिकार्‍यांचे नियोजन नसल्याकारणाने शासनाचे लाखो रुपयांचे खर्च विनाकारण वाया जात आहेत. वारंवार मागणी करून देखील संबंधित अधिकारी नगरसेवकांना सदर कामाची व ठेकेदाराबाबतची माहिती न देता माहिती लपवून ठेवत आहेत.

तरी याबाबत मुख्याधिकार्‍यांनी त्वरित गांभीर्याने दखल घेऊन सदर श्रीरामपूरचे वैभव असलेले मिनी स्टेडियमचे काम त्वरित मार्गी लावून पूर्ण करावे, अशी मागणी रवींद्र गुलाटी यांनी यावेळी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या