Thursday, April 25, 2024
Homeनगरमहिनाभरात एक लाख 63 हजार लिटर दुधाचे उत्पादन वाढले

महिनाभरात एक लाख 63 हजार लिटर दुधाचे उत्पादन वाढले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात लम्पीच्या संसर्गामुळे पशुसंवर्धन विभागासह शेतकरी मेटाकुटीला आलेला असतानाही सप्टेंंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात दुधाच्या उत्पादनात एक लाख 63 हजार लिटरने वाढ झाली आहे. जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात दुधाचे दैनदिन उत्पादन हे प्रती दिवस 42 लाख 62 हजार 202 लिटर होते ते ऑक्टोबर महिन्यात 44 लाख 26 हजार लिटर झाले आहे. एकाच महिन्यात जिल्ह्यात दीड लाख लिटरपेक्षा अधिक वाढ झाली आहे.

- Advertisement -

राज्याच्या नकाशावर नगर जिल्हा दूध आणि साखर उत्पादनात अग्रेसर जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात मल्टिस्टेट, सहकारी, खासगी आणि अन्य अशी दूध संकलन करणारी यंत्रणा आहे. यासह प्रत्येक तालुक्यात दूध संकलन करणारी शेकडा दूध संकलन केंद्रे आहेत. पूर्वीपासून नगर जिल्ह्याची दूध उत्पादनात मक्तेदारी राहिलेली आहे. जिल्ह्यात खासगी, सहकारी, मल्टिस्टेट दूध संघ, खासगी कार्यरत कंपन्या आहेत. यासह नगरच्या दुधाला मुंबई, पुण्यासह अन्य जिल्ह्यांत आणि राज्याबाहेर चांगली मागणी आहे.

ऑक्टोबर महिन्यांच्या आकडेवारीत जिल्ह्यात राहाता तालुक्यात सर्वाधिक 9 लाख 61 हजार लिटर दूधाचे दैनदिन उत्पादन झालेले आहे. तर सर्वात कमी शेवगाव तालुक्यात 23 हजार 500 हजार लिटर दूधाचे उत्पादन दिसत आहे. यासह पारनेर, नेवासा, संगमनेर आणि राहुरी हे तालुके दूध उत्पादनात आघाडीवर आहेत. दुधाला मिळणार चांगला भाव, मुबलक चारा आणि पाणी यामुळे जिल्ह्यातील दूधाचे उत्पादन वाढत असल्याचे पशूसंवर्धन विभाग आणि जिल्ह्यात दूध व्यवसाय विभागाकडून सांगण्यात येत आहे.

मात्र, गत दोन ते अडीच महिन्यांपासून लम्पी या चर्मरोगामुळे मोठ्या संख्याने दुभती जनावरे आजारी पडत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील 220 गावात लम्पीचा शिरकाव झालेला असून 33 हजार 532 जनावरांना लम्पीचा संसर्ग झालेला आहे. यातील 23 हजार 655 जनावरांनी लम्पीवर मात केलेली असून 2 हजार 173 जनावरे मृत झालेली आहेत. गेल्या दीड महिन्यांत लम्पीमुळे मृृत पावणार्‍या जनावरांची जवळपास दुप्पट झालेली आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला आहे. शासन लम्पीमुळे मृत पावणार्‍या जनावरांच्या मालक शेतकर्‍यांना भरपाईत असली तरी जनावरांच्या वाढलेल्या किंमती आणि मिळणारी भरपाई यात मोठी तफावत दिसत आहे. दुसरीकडे लम्पी चर्मरोग आणि गायीच्या दूधाचा काही संबंध नसून लम्पीग्रस्त गायीचे दूध माणसांसाठी सुरक्षीत असल्याचे पशूसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.

जनावरातील टीबीसह अन्य 20 ते 25 प्रकारातील आजार हे जनावरातून माणसांना होवू शकतात. मात्र, लम्पी रोगाचा प्रसार बाधित जनावरांच्या दूधातून माणसांना होत नाही. लम्पी बाधित जनावरांचे दूध माणसांसाठी सुरक्षीत आहे.

– डॉ. सुनील तंबारे, पशूसंवर्धन उपायुक्त, अहमदनगर.

तालुकानिहाय उत्पादन

पारनेर 6 लाख 63 हजार 294, श्रीगोंदा 2 लाख 10 हजार 374, राहुरी 3 लाख 71 हजार 701, नगर 89 हजार 300, जामखेड 58 हजार 900, अकोले 97 हजार 950, कर्जत 2 लाख 49 हजार 100, संगमनेर 4 लाख 66 हजार 88, श्रीरामपूर 2 लाख 8 हजार 810, नेवासा 5 लाख 71 हजार 140, राहाता 9 लाख 61 हजार 131, कोपरगाव 2 लाख 39 हजार 808, पाथर्डी 2 लाख 39 हजार 808 आणि शेवगाव 23 हजार 500 असे उत्पादन आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या