चालू महिन्यात तिसर्‍यांदा उतरले दुधाचे दर

jalgaon-digital
2 Min Read

सुपा |वार्ताहर| Supa

जीवनावश्यक वस्तूंचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडत असताना. सर्वासाठी अमृतासमान असलेल्या परंतु शेतकर्‍यांनी उत्पादीत केलेल्या दुधाचे दर मे महिन्यांत तिसर्‍यांदा उतरले आहेत. यामुळे बळीराजाला उद्ध्वस्त करण्याचा विडा जणुकाही सर्वांनीच उचलला आहे की काय, अशी परिस्थिती उत्पादक शेतकर्‍यांमध्ये निर्माण झाली आहे.

गेल्या वर्षभरापासून करोनामुळे भाजीपाला पिकवूनही बाजारपेठ बंद असल्याने भाजीपाला शेताच्या बांधावर फेकून दिला जात आहे. अन्नधान्य व कडधान्यांचे बाजार बंद आहेत. करोनामुळे कांदा आडती बंद आहेत.त्यामुळे शेतकर्‍यांना नाइलाजास्तव कांदा साठवावा लागत आहे. त्यात निसर्ग आपले रंग दाखवत असून तापमानातील चढ-उतार तर कधी वादळ यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे.

त्यातच गेल्या 15 दिवसांत दुधाचे दर तीन वेळा कमी होऊन शेतकर्‍यांच्या जखमांवर मीठ चोळले जात आहे. दुधाचे दर 1 मे रोजी कमी झाले, त्यानंतर 6 तारखेला पुन्हा दुधाचे दर कमी झाले. त्यानंतर 11 तारखेला पुन्हा दुधाचे दर कमी केले, महिन्यात तीन वेळा दुधाचे दरकमी झाले आहेत. आज रोजी सुपा औद्योगिक वसाहतीतील दूध शितकरण केंद्र गायीच्या दुधाला 21.50 पैसे तर म्हैसीचे दुधाला 35 ते 40 रुपये दर देत आहेत. या बाजारभावात शेतकर्‍यांचा खर्चही निघत नाही.

पशुखाद्यात शेंगदाणा पेंड 2 हजार 400, लेंडी पेंड 1 हजार 400 ते 1 हजार 500 रुपये तर सरकी पेंड 1 हजार 300 रुपये प्रत्येक 50 किलोचे दर आहेत. पशुखाद्याच्या किंमती नियमित वाढत असताना दुधाचे दर मात्र महिन्यात तीन वेळा खाली येत असल्याने शेतकर्‍यांना कोणीच वालीच नसल्याचे दिसत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *