Thursday, April 25, 2024
Homeनगरमहाविकास आघाडी सरकारने दूध उत्पादकांना वार्‍यावर सोडले

महाविकास आघाडी सरकारने दूध उत्पादकांना वार्‍यावर सोडले

करंजी |वार्ताहर| Karanji

राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने पाण्याच्या भावात दुधाचे मोल करून या राज्यातील सर्व दूध उत्पादक शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडण्याचे काम केले असून दुधाचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळल्याने दूध उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आला असल्याची भावना पाथर्डी शेवगाव मतदारसंघाचे आमदार मोनिकाताई राजळे यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर येथे भारतीय जनता पार्टी महायुतीच्या वतीने महादूध एल्गार आंदोलनाची सुरुवात आमदार मोनिकाताई राजळे यांच्या नेतृत्वाखाली येथील पोस्ट कार्यालयातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून करण्यात आली. यामध्ये गायीच्या दुधाला 30 रुपये प्रति लिटर भाव द्यावा. तसेच दुधाकरीता प्रति लिटर 10 रुपये अनुदान द्यावे व दूध भुकटीला 50 रुपये प्रति किलोप्रमाणे अनुदान द्यावे, अशी मागणी पाठविलेल्या पत्राद्वारे करण्यात आली.

आमदार मोनिकाताई राजळे म्हणाल्या, करोना संसर्गामुळे मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलेल्या बळीराजाला दिलासा देण्याऐवजी राज्य सरकारने शेतकर्‍याला दुधाचे भाव कमी करून आणखी आर्थिक अडचणीत टाकण्याचे काम केले आहे. पाण्याच्या बाटलीला 20 रुपये मोजावे लागत आहेत तर एक लिटर दुधाला 18 रुपये भाव मिळत आहे.

त्यामुळे पाण्याच्या भावात दुधाचे मोल या सरकारच्या माध्यमातून झाले असल्याने दुधाला भाव वाढ देऊन राज्यातील शेतकर्‍याला दिलासा देण्याचे काम या सरकारने करावे असे आवाहन आमदार राजळे यांनी केले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, दूध उत्पादक शेतकरी दत्तात्रय मराठे, सुभाष माने, सतिष कराळे, बाळासाहेब लवांडे, शरद पडोळे, संजय कावळे, अर्जुन शिंदे, गंगाराम शिंदे, सरपंच शेषराव कचरे, महेश नांगरे, सुरेश पवार, भाऊसाहेब शिदोरे, रामेश्वर राजळे, डॉ. दत्तात्रय म्हस्के आदी दूध उत्पादक शेतकर्‍यांनी आपल्या भावना टपाल पेटीत पत्र टाकून मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे कळवल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या