आदिवासी बहुल भागातील बालकांना दूध भुकटी मोफत वाटप होणार

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेंतर्गत जळगाव, धुळे, नंदुरबार यासह आठ जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागातील बालकांना, गदोदर महिला, स्तनदा माता यांना दूध, भुकटी मोफत वाटप करण्यात येणार आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील यावल, रावेर, चोपडा या तीन तालुक्यात ही योजना लागू होणार आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी आर.आर. तडवी यांनी दिली.

कृषी व पदुम विभागाने आदिवासी विभागाच्या नियंत्रणाखाली राबविण्यात येणार्‍या अमृत आहार योजनेतील लाभार्थ्यांना मोफत दूध, भुकटी उपलब्ध करुन देण्यास व सदर यंत्रणा महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित यांचेमार्फत राबविण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.

तसे आदेश जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाला दि.2 डिसेंबर रोजी प्राप्त झाले आहे.

लाभार्थ्यांच्या संख्येनुसार 6,51,000 विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी दिन 18 ग्रॅम व 1,21,000 गरोदर महिला व स्तनदा माता प्रति महिला प्रति माह 25 ग्रॅम यानुसार प्रति विद्यार्थी प्रति माह 250 ग्रॅमचे 02 पॅकेटस् व प्रति महिला प्रति माह 250 ग्रॅम दूध भुकटीचे 03 पॅकेटस् संबंधित उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( बालकल्याण) जिल्हा परिषद यांचे नियंत्रणाखाली एकात्मिक बाल विकास प्रकल्पामार्फत संबंधित आहार समितीस वाटप करावयाचे आहे.

राज्यातील पालघर, ठाणे, धुळे, नाशिक, नंदुरबार, जळगाव, अमरावती व यवतमाळ या जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागात या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

दूध, भुकटी पुरविण्याचे काम म.रा. सहकारी दूध महासंघ मर्यादित मुंबई महानंद दुग्धशाळा करणार आहे. संबंधित जिल्हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( बालकल्याण ) यांनी दूध महासंघाकडून प्राप्त झालेली दूध, भुकटी जिल्हा, तालुकास्तरवरील गोडाऊनमध्ये साठवणूक करुन तेथून पुढे लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी वाहतूक व इतर व्यवस्था करावयाची आहे.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालकल्याण विभागाने वाहतूक ठेकेदार, मेगा वितरक यांच्याकडून लाभार्थ्यांच्या संख्येनुसार दूध, भुकटीचे पॅकेटस् स्विकारुन त्यांची पोच दूध महासंघशस द्यावी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( बालकल्याण ) जिल्हा परिषद यांचे नियंत्रणाखाली एकात्मिक बालविकास प्रकल्पामार्फत आहार समितीस वाटप करण्याची कार्यवाही करावी.

सदर दूध, भुकटीचे वितरण एफआय एफओ पद्धतीने करावे, असे निर्देश असेप्टीकचे प्रभारी व्यवस्थापक रमेश पाटील यांनी दिले आहेत.