दूध उत्पादकांना प्रतीलिटर पाचरुपये अनुदान द्या

jalgaon-digital
2 Min Read

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Devlali Pravara

करोना महामारीमुळे आधीच शेती व शेतीव्यवसायाची वाट लागली असतांना शेतीला जोडधंदा म्हणून ग्रामीण अर्थ व्यवस्थेचा कणा समजला जाणारा दूध व्यवसाय लॉकडाऊनमुळे दुधाचे दर निचांकी पातळीवर आल्याने अत्यंत अडचणीत सापडला आहे. यातून सावरण्यासाठी शासनाने दूध दरात वाढ करुन प्रतीलिटर 30 रुपयेप्रमाणे दूध खरेदी करावे किंवा प्रतीलिटर 5 रुपयेप्रमाणे दूध उत्पादकांना अनुदान द्यावे, अशी मागणी जिल्हा दूध फेडरेशनचे अध्यक्ष गणेश भांड यांनी केली आहे.

भांड म्हणाले, करोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर दूध व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येऊ लागला होता. सर्वत्र दुधाला मागणी वाढत असल्याने दुधाचे दर प्रतीलिटर 32 रुपयावर गेले होते. दूध उत्पादक शेतकर्‍यांना अच्छेदिन येणार असे वाटत असतांनाच पुन्हा करोना महामारीची महाभयकंर दुसरी लाट आली. आणि दुधाचे दर कोसळण्यास सुरुवात झाली. लॉकडाऊन लागल्यानंतर 32 रुपये लिटरवरुन दूधाचे दर 24 ते 25 रुपये प्रतीलिटरवर आले आहेत. यामुळे दूध उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे. दूध व्यवसायावर प्रतिकूल परिणाम झाल्याने हा व्यवसाय अत्यंत अडचणीत सापडला आहे. परिणामी दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.

दूध व्यवसायामुळे रोख चलन हातात येत असल्याने गोरगरीब शेतकर्‍यांच्या उदारनिर्वाहाचे साधन म्हणून हा व्यवसाय ओळखला जात आहे. या सर्व बाबीचा शासनाने गांभीर्याने विचार करुन 30 रुपये प्रतिलिटरने दूध खरेदी करावे किंवा प्रतिलिटर 5 रुपये प्रमाणे दूध उत्पादकांना त्वरीत अनुदान द्यावे, अशी मागणी भांड यांनी केली आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही दूध व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात दूधापासून उपपदार्थाची निर्मिती केली होती. परंतु लॉकडाऊन लागल्याने हा सर्व माल वाया गेल्याने व्यावसायिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे कामगारांचे पगार, बँकांचे घेतलेल्या कर्जाचे हप्ते कसे फेडायचे? हा यक्षप्रश्न व्यावसायिकांसमोर आ वासून उभा असल्याने सर्वचजण मोठ्या अडचणीत सापडले आहेत. यातून सावरण्यासाठी शासनाने मदत करावी, अशी मागणी जिल्हा दूध फेडरेशनचे अध्यक्ष गणेश भांड, सचिव राजेंद्र काळे, शेतकरी नेते राजेंद्र लोंढे आदींसह दूध उत्पादक शेतकर्‍यांनी केली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *