Saturday, April 27, 2024
Homeनगरएमआयडीसीतील सराईत भाकरे टोळीविरूध्द ‘मोक्का’

एमआयडीसीतील सराईत भाकरे टोळीविरूध्द ‘मोक्का’

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

संघटीत गुन्हेगारी करणार्‍या भाकरे टोळी विरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमातील (मोक्का) कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलिसांनी पाठविलेल्या प्रस्तावाला नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी मान्यता दिली आहे.

- Advertisement -

टोळी प्रमुख प्रेम नरेंद्र भाकरे (वय 19), टोळी सदस्य कुबड्या ऊर्फ किरण दशरथ पालवे, ढाच्या उर्फ नाविन्य संजय भाकरे (वय 18), आशिष अशोक भाकरे (वय 25), घार्‍या उर्फ अभिषेक अरविंद भिंगारदिवे, गणेश काळे, संतोष रघुनाथ धोत्रे (सर्व रा. नवनागापूर, अहमदनगर) अशी मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) अजित पाटील करीत आहेत.

तरुणाला फोन करून बोलावून घेत चाकू व बिअरच्या बाटल्या डोक्यात फोडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला होता. अल्ताफ अल्लाउद्दीन बागवान (वय 25 रा. गजानन कॉलनी, नवनागापूर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर अहमदनगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याने एमआयडीसी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून खुनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. नागापूर येथील सेंट मेरी चर्च येथे ही घटना घडली होती.

दरम्यान सदरचा गुन्हा भाकरे टोळीने केल्याचे समोर आले होते. एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना अटक केली हेाती. या गुन्ह्यासह भाकरे टोळीने केलेल्या इतर गुन्ह्याची माहिती एमआयडीसी पोलिसांनी काढली. भाकरे टोळीविरूध्द मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यासाठी पोलीस उपअधीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी प्रस्ताव पाठविला होता. सदर प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शेखर पाटील यांनी मंजूर केला आहे.

दोन अल्पवयीन मुलांना वगळले

सदर घटना घडली त्यावेळी गुन्ह्यात असलेले व भाकरे टोळीत सक्रिय असलेल्या दोन अल्पवयीन मुलांसह नऊ आरोपींविरूध्द मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात यावी, असा प्रस्ताव एमआयडीसी पोलिसांनी पाठविला होता. दरम्यान त्यातील दोन अल्पवयीन मुलांवर मोक्का लावण्यात आला नसून त्यांना यातून वगळण्यात आले आहे. मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आलेल्या सात पैकी सहा आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली असून गणेश काळे पसार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या