Thursday, April 25, 2024
Homeनगरम्हसोबा मंदिराची दानपेटी अज्ञात चोरट्यानी फोडली

म्हसोबा मंदिराची दानपेटी अज्ञात चोरट्यानी फोडली

लोणी |वार्ताहर| Loni

राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील ग्रामदैवत म्हसोबा मंदिराची दानपेटी शनिवारी मध्यरात्री 2 वाजता अज्ञात दोघांनी फोडली.

- Advertisement -

त्यात सुमारे 50 हजाराची रोकड असण्याची शक्यता आहे. दरम्यान अज्ञात आरोपी मंदिराच्या सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. मात्र गेल्यावर्षी याच मंदिराच्या दानपेटी फोडणारांचा तपास न लागल्याने ग्रामस्थांनी पोलिसांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

संपूर्ण राज्यातून भाविक लोणीच्या म्हसोबा महाराजांच्या दर्शनाला येत असतात. यावर्षी करोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून मंदिर बंद आहे. तरीही भाविक नियमांचे पालन करून बाहेरूनच दर्शन घेतात आणि दानपेटीत यथाशक्ती दानही टाकतात. साधारणपणे सहा महिन्याला या दानपेटीत 40 ते 50 हजारांपर्यंत रक्कम जमा होते.

शुक्रवारी सकाळी मंदिराचे पुजारी पूजेसाठी आले असताना त्यांना मंदिराचे प्रवेशद्वार तोडल्याचे लक्षात आले. त्यासोबतच मंदिराची मुख्य दानपेटी जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास पडले. त्यांनी सरपंच व इतर प्रमुख कारभारी मंडळींच्या कानावर ही बाब घातली. ग्रामस्थांनी पोलिसांना कळवले.

गावकरी मंदिरस्थळी जमा झाले. शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक श्री. सातव, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, उपनिरीक्षक नाना सुर्यवंशी व पोलीस कर्मचारी आणि स्वान पथक घटनास्थळी पोहचले. स्वानाने सुरभी मंगल कार्यालयापर्यंत आरोपींचा मार्ग दाखवला. मंदिराच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन अज्ञात मास्क आणि हॅन्ड ग्लोज घालून मंदिराची दानपेटी घेऊन जाताना दिसून आले.

मंदिराजवळच बसस्थानकालगत चोरट्यांनी दानपेटी नेऊन ती उलटी करून तिच्यातील रोख रक्कम काढून नेली. फुटेजमध्ये रात्री 2 वाजताची वेळ दिसून आली. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात या मंदिराची दानपेटी फोडण्यात आली होती. त्यावेळीही सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे कैद झाले होते. मात्र पोलिसांना त्यांचा शोध अद्यापही घेता न आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी दिसून आली.

अनेकांनी तर मागचाच तपास लागला नाही मग याचा तरी कसा लागणार अशी निराशाजनक प्रतिक्रिया दिली. आता आरोपी सापडले नाही तर दरवर्षी चोरी होतच राहणार का? मग पोलीस काय करतात अशा शब्दात तीव्र भावना व्यक्त केल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या