Thursday, April 25, 2024
Homeनगरम्हैसगाव येथील खासगी सावकार गजाआड

म्हैसगाव येथील खासगी सावकार गजाआड

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

गेल्या अनेक वर्षांपासून राहुरी तालुक्यात बेकायदा सावकारांनी उच्छांद मांडला असून खाजगी सावकारांच्या जाचास कंटाळून आजपर्यंत अनेक जणांनी आत्महत्या केल्या आहेत. काहींनी आत्महत्याचा प्रयत्न केला तर काहिजण गाव सोडून परागंदा झाले आहेत. राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील अशाच एका खाजगी सावकारावर नुकताच गुन्हा दाखल करून त्याला गजाआड करण्यात आले.

- Advertisement -

राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील भास्कर राजाराम बेलकर हा गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदा खाजगी सावकारकी करतो. त्याने अनेक लोकांना व्याजाने पैसे देऊन त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा व्याज वसूल करत आहे. त्याच्या जाचास कंटाळून 4 मार्च 2023 रोजी शशिकांत भाऊसाहेब गागरे व इतर काही जणांनी सहाय्यक निबंधक कार्यालयात त्याची तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेत सहाय्यक निबंधक कार्यालयातील पथकाने आरोपी भास्कर राजाराम बेलकर याच्या म्हैसगाव येथील राहत्या घरात 9 मे रोजी सकाळी 10 वाजे दरम्यान अचानक छापा टाकला.

त्यावेळी घराची झडती घेतली असता त्यांना काही कोरे धनादेश, काही सह्या केलेले धनादेश तसेच काही स्टॅम्प पेपर, विसार पावत्या, अनेकांच्या वाहनाची कागदपत्रे आणि अनेक व्यवहार केल्याची नोंदी असलेली एक वही मिळून आली. मिळालेला सर्व दस्तऐवज ताब्यात घेऊन त्याची तपासणी करण्यात आली. त्या तपासणीमध्ये भास्कर राजाराम बेलकर हा बेकायदा खाजगी सावकारकी करत असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार दि. 13 मे रोजी सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहाय्यक सहकार अधिकारी मुबीन अजीज शेख यांच्या फिर्यादीवरून आरोपी भास्कर राजाराम बेलकर याच्यावर गुन्हा रजि. नं. 508/2023 महाराष्ट्र सावकारी 2014 चे कलम 39 नूसार बेकायदा सावकारकी चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी भास्कर राजाराम बेलकर याला पोलीसांनी ताबडतोब ताब्यात घेऊन गजाआड करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या